पणजी : वीरधवल खाडे आणि पलक जोशी या महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी गुरुवारी दुसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घालत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्राने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरण या खेळामध्ये दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण पाच पदकांवर मोहोर उमटवली.
ऑलिंपियन वीरधवलने ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २४.६० सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली आणि २०१५ मध्ये त्यानेच नोंदवलेला २४.७३ सेकंद हा विक्रम मोडला. बुधवारी त्याने येथे ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत जिंकून वेगवान जलतरणपटूचा मान मिळवला होता. याच शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या मिहीर आंम्ब्रेने वीरधवलच्या पाठोपाठ ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २४.६७ सेकंदांत पूर्ण करीत रौप्यपदक जिंकले.
पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दासने ५७.३७ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. या शर्यतीत ऑलिंपियन श्रीहरी नटराजन (५५.५९ सेकंद) हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
महिलांच्या १०० मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशीने सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर एक मिनीट व ०५.२९ सेकंदांत पार केले. याआधी तिने या स्पर्धेत २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीचेही विजेतेपद मिळवले होते. ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत मात्र ऋजुता खाडेला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
वॉटरपोलोमध्ये दोन्ही संघ उपांत्य फेरीत
वॉटरपोलो या खेळामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष व महिला या दोन्ही विभागांमध्ये विजयी मालिका कायम ठेवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. पुरुष विभागात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीनंतर केरळ संघावर ६-४ अशी मात केली. महाराष्ट्र संघाकडून आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये गौरव महाजनी व पियूष सूर्यवंशी यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
केरळ संघाने शेवटच्या डावात दोन गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली होती, मात्र महाराष्ट्राने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवीत सामना जिंकला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पश्चिम बंगालबरोबर सामना होणार आहे. महिला विभागात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर १५-७ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून राजश्री गुगळे व पूजा कुंबरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची केरळ संघाशी गाठ पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.