National Sport news esakal
क्रीडा

National Sport : महाराष्ट्राची तलवारबाजीत पदकांची पंचमी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : एक रौप्य आणि चार ब्राँझपदकांची ऐतिहासिक कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी फेन्सिंग (तलवारबाजी) या खेळामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाच पदकांची माळ आपल्या गळ्यात घालत ऐतिहासिक प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या खेळात एक रौप्यपदक आणि चार ब्राँझपदकांना गवसणी घातली.

तलवारबाजीतील सेबर सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्राँझपदक जिंकले. सेबर सांघिक पुरूषांमध्ये महाराष्ट्राचा सामना उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जम्मू काश्मीर संघासोबत झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने (४५- ४३) अवघ्या दोन गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत पंजाब संघासोबत झाली. पंजाब संघााने ४५-३३ अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील पराभवामुळे महाराष्ट्र संघास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात अभय शिंदे, धनंजय जाधव, श्रीशैल शिंदे व ऋत्विक शिंदे या खेळाडूंचा समावेश होता.

समर्थ, रुचिताचा अचूक वेध

युवा नेमबाज समर्थ मंडलिक आणि रुचिता विनेरकरने महाराष्ट्र संघाला नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. या दोघांनी एअर पिस्तूल मिश्र गटात ब्राँझपदक आपल्या नावे केले. याआधी रुद्रांश पाटीलने नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ अभिज्ञा पाटीलने ब्राँझपदकावर मोहोर उमटवली. हीच लय कायम ठेवत समर्थ आणि रुचितानेही पदक जिंकले.

स्क्वॉशमध्ये राज्याला संमिश्र यश

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष स्क्वॉश संघाने अंतिम फेरीत धडक मारून एक पदक निश्चित केले आहे. आयआयटी गांधीनगर येथे मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेतील लढतीत महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने बलाढ्य सेनादलाच्या संघास २-१ ने पराभूत करून अंतिम फेरी गाठली हे विशेष. महिला गटात महाराष्ट्राचा महिला संघ ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने अप्रतिम कामगिरी करीत उपांत्य फेरी गाठली होती. महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात उपांत्य सामना झाला. यात तमिळनाडू संघाने २-० अशा फरकाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र महिला स्क्वॉश संघास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

डायव्हिंगमध्ये ओम तिसरा

पुरुषांच्या हायबोर्ड डायव्हिंगमध्ये ओम अवस्थी याने ब्राँझपदक पटकावले. सोलापूरच्या या खेळाडूने या क्रीडा प्रकारात अप्रतिम कौशल्य व लवचिकता दाखवली. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये त्याने महाराष्ट्राला भरघोस पदके मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. ओम हा १९ वर्षीय खेळाडू सोलापूर येथील मार्कंडेय तलावावर श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तसेच त्याला हरीश अन्नलदास यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. तो पुण्यातील वाडिया महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे.

जिम्नॅस्टिक्समध्येे मोठे यश

रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट किताबाच्या अंतिम स्पर्धा मंगळवारी झाल्या. यात महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व गाजवत एक सुवर्ण व एक रौप्यपदक प्राप्त केले. खेलो इंडियामध्ये अव्वल ठरलेली संयुक्ता काळे (ठाणे) हिने सोमवारी झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये सर्व खेळाडूंवर आघाडी मिळवली होती, ती कायम राखत रिबन, क्लब, बॉल आणि हूप या चार साधनांवर उत्कृष्ट कामगिरी करून १०१.६५ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्याच रिचा चोरडियाने संयुक्ताला कडवी लढत देत ९९.१५ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT