पणजी - गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारी पिंच्याक सिल्याट, जलतरण आणि वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांनी महाराष्ट्राची यशोपताका फडकवत पदकतालिकेत अग्रस्थानी कायम ठेवले आहे. महाराष्ट्राने रविवारी १ सुवर्ण, ४ रौप्य, २ ब्राँझ अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खात्यावर आतापर्यंत ४१ सुवर्ण, २५ रौप्य, २८ कांस्य अशी एकूण ९४ पदके असून महाराष्ट्र उद्या सोमवारी पदकांचे शतक साजरे करील यात शंका नाही.
पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदारने सुवर्णपदक, तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांनी रौप्यपदके पटकावली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक ब्राँझ अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली. वेटलिफ्टिंगमध्ये अखेरच्या दिवशी महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने ब्राँझपदक पटकावले.
योगिता खेडकरला ब्राँझपदक
वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने ब्राँझपदक पटकावले. योगिताने ८९ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन-जर्क असे एकूण १९८ किलो वजन उचलून तिसरा क्रमांक पटकावला. तिने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली, तर तिसऱ्या प्रयत्नात उचललेले ८९ किलो वजन ग्राह्य धरण्यात आले.
क्लीन-जर्कमधील तीन प्रयत्नांत तिने अनुक्रमे १०३, १०७ आणि १०९ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या रुचिका ढोरेने ८८ किलो स्नॅच व १०९ किलो क्लीन-जर्क असे १९७ किलो वजन उचलले, पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वेटलिफ्टिंगमध्ये नऊ पदकांची कमाई
महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात यंदा तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन ब्राँझ अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली आहे. अहमदाबादला गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण दोनच पदके मिळवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.