malvika bansod sakal
क्रीडा

National Sports Competition : मालविका बनसोडला रौप्यपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; आकर्शी कश्‍यपकडून अंतिम फेरीत पराभूत

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्णपदकाची एकमेव आशास्थान असलेल्या मालविका बनसोडला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत अटीतटीच्या लढतीत मालविकाला पराभव स्वीकारावा लागला. आकर्शी कश्‍यप हिने महिला एकेरीच्या गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मालविका बनसोड आणि आकर्शी कश्यप यांच्यातील सुवर्णपदकाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अंतिम सामन्यातील पहिला गेम आकर्शी कश्यप हिने २१-८ असा सहज जिंकून आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये मालविकाला अपेक्षित लय सापडू शकली नाही. मात्र, दुसऱ्या गेममध्ये मालविकाने आकर्शीला चांगलेच झुंजवले. दुसऱ्या गेममध्ये मालविकाला चांगला सूर सापडला होता. ९-९ च्या बरोबरीनंतर मालविकाने ३ गुणांची आघाडीदेखील घेतली होती. त्या वेळी मालविका दुसरा गेम जिंकेल, असे वाटत होते. परंतु, आकर्शीने जोरदार प्रत्युत्तर देत मालविकावर दबाव वाढवला. त्यात मालविकाकडून काही चुकादेखील झाल्या. आकर्शी कश्यप हिने दुसरा गेम २२-२० असा जिंकून सुवर्णपदक जिंकले. कडवी झुंज देऊन पराभव स्वीकारावा लागलेल्या मालविका बनसोडला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यातील दुसरा गेम प्रेक्षणीय झाला. दोन्ही खेळाडू प्रत्येक गुणांसाठी कसून प्रयत्न करत होते. उत्कृष्ट रॅलीजचा खेळ पाहावयास मिळाला. यात मालविकाचे अनेक फटके नेटमध्ये गेले आणि त्याचा फटका तिला बसला. अखेरच्या काही गुणांसाठी उत्कृष्ट रॅलीजचा खेळ झाला. या गेममध्ये मालविका कमबॅक करेल, असे वाटत असताना तिचे काही शॉटस् नेट व मैदानाबाहेर गेले. त्याचा फायदा आकर्शीने घेत सामना जिंकला.

डायव्हिंगमध्ये अनुजला ब्राँझपदक

महाराष्ट्राच्या अनुज शहा याने पुरुषांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात ब्राँझपदक पटकाविले. चुरशीच्या लढतीत त्याने सूर मारताना अप्रतिम कौशल्य आणि लवचिकता दाखवली. मी जरी पदव्युत्तर पदवी घेत असलो, तरीही माझ्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळामुळे माझी एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. आपोआपच मला अभ्यासासाठी मानसिक बळही मिळते. त्यामुळेच मी डायव्हिंग प्रकारात अजूनही भाग घेत आहे. राजकोट येथे महाराष्ट्राला पदक मिळावे या दृष्टीनेच मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. पदक मिळो वा न मिळो, माझे सर्वोत्तम कौशल्य दाखवण्यासाठीच मी नेहमी प्रयत्न करीत असतो. येथे मला ब्राँझपदक मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे, असे अनुज याने सांगितले.

हॉकीमध्ये महाराष्ट्राचा लागोपाठ तिसरा विजय

राजकोट येथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेतील पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने साखळी विभागात सलग तिसरा विजय नोंदविला. त्यांनी तुल्यबळ पश्चिम बंगाल संघाचा २-० असा पराभव केला. महाराष्ट्राच्या या विजयात आंतरराष्ट्रीय खेळाडू देवेंद्र वाल्मीकी यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्याने १४ व्या आणि १६ व्या मिनिटाला गोल करीत संघास सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पश्चिम बंगालने जोरदार आक्रमण केले; परंतु महाराष्ट्राच्या बचाव फळीने त्यांच्या चाली अयशस्वी ठरविल्या. महाराष्ट्राने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

स्क्वॉश स्पर्धेत ऊर्वशी जोशीला रौप्यपदक, राहुल बैठाला ब्राँझपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्क्वॉश खेळाडूंनी वैयक्तिक रौप्य व ब्राँझ अशी दोन पदके जिंकली. ऊर्वशी जोशी हिने रौप्यपदक; तर राहुल बैठा याने ब्राँझपदक जिंकले. आयआयटी गांधीनगर येथे स्क्वॉश स्पर्धा झाली. स्पर्धेच्या अंतिम दिवशी महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी दोन पदके जिंकून स्पर्धेचा शानदार समारोप केला. महाराष्ट्राच्या ऊर्वशी जोशी हिने रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत ऊर्वशीला तमिळनाडूच्या सुनयना कुरुविलाकडून ११-७, ११-८, ७-११, ६-११, ४-११ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ऊर्वशी जोशीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या राहुल बैठा याने ब्राँझपदक संपादन केले. तमिळनाडूच्या अभय सिंग याने राहुलला ७-११, ११-८, ११-६, ११-९ असे ३-१ ने पराभूत केले. या लढतीत राहुलने सुरवात विजयाने केली होती; परंतु, त्यानंतर अभयने त्याच्यावर वर्चस्व गाजवत अंतिम फेरी गाठली.

मुष्टियुद्धामध्ये निखिलची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या निखिल दुबे याने मुष्टियुद्ध स्पर्धेत शानदार सलामी दिली. त्याने मिडलवेट गटातील पहिल्या लढतीत राजस्थानच्या प्रीतेश विश्नोई याचा पराभव केला. त्याने ही लढत ४-१ अशी जिंकली. या लढतीत सुरुवातीपासूनच निखिल याने आक्रमक पवित्रा घेतला होता. आक्रमण हाच बचावाचा खरा मंत्र, असे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही.

महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघाची निराशा

महाराष्ट्र महिला फुटबॉल संघाला गुरुवारी पराभवाचा सामना करावा लागला. आसाम संघाने सर्वोत्तम खेळ करीत महाराष्ट्रावर मात केली. आसाम संघाने २-० ने विजय संपादन केला. पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र संघाला शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात एकही गोल करता आला नाही.

मल्लखांब मध्ये निर्विवाद वर्चस्वाची महाराष्ट्राला संधी

मल्लखांब या पारंपरिक खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कायमच राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व राखले आहे. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही ही परंपरा राखण्याची त्यांना खात्री आहे. नऊ सुवर्ण व सात रौप्य पदके मिळवण्याबाबत महाराष्ट्र संघ व्यवस्थापन आशावादी आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाने गणेश देवरुखकर व नंदिनी कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर तयारी केली आहे.

वुशूच्या स्पर्धा आजपासून

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वुशू खेळात महाराष्ट्राचे दहा खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असल्याचे महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सरचिटणीस व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सोपान कटके यांनी सांगितले. महात्मा मंदिर इनडोअर स्टेडियममध्ये वुशू स्पर्धेला शनिवारपासून (८ ऑक्टोबर) प्रारंभ होणार आहे. सांन्सू प्रकारात ओमकार पवार (५६ किलो), संकेत पाटील (६० किलो), ऋषिकेश मालोरे (६५ किलो), प्रथमेश शेट्टी (७० किलो), निर्मल शेटे (७५ किलो) हे खेळाडू सुवर्णपदकासाठी लढतील.

मुलींच्या संघात ऋतुजा सुर्वे (६० किलो) ही ताऊलू या प्रकारात, तर श्रावणी कटके ही ताईजीक्वॉन व ताईजीजैन इव्हेंट प्रकारात खेळणार आहे. राज मल्हार व्हटकर (ताईजीक्वॉन) व खुशी तेलकर (ताईजीजैन इव्हेंट) आणि तृप्ती चांदवडकर (चनक्वॉन) या प्रकारात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT