लखनौ : नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबरला झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातील लढतीत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी मात करीत सनसनाटी निकालाची नोंद केली.
आता हा संघ उद्या आणखी एका कसोटी खेळणाऱ्या देशाला पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यामध्ये लखनौ येथे ही लढत रंगणार आहे. श्रीलंकन संघाला पहिल्या तीनही लढतींत हार पत्करावी लागली आहे. या स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी श्रीलंकन संघाला या लढतीत विजय आवश्यक आहे.
श्रीलंकन फलंदाजांनी दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान या दोन्ही देशांविरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती. मात्र गोलंदाजांना अपयश आल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत पाथुम निसांका व कुशल परेरा या सलामी जोडीने १२५ धावांची भागीदारी करताना दमदार सुरुवात करून दिली, पण त्यानंतर त्यांचा डाव कोसळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पाच विकेट राखून विजय संपादन करता आला. हा त्यांचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला.
श्रीलंकन संघासाठी आता उद्याच्या लढतीत विजय आवश्यक आहे. वनिंदू हसरंगा, दसुन शनाका हे खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेमध्ये खेळत नाहीत. याचा फटका त्यांना बसत आहे. आता अँजेलो मॅथ्यूज व दुशमंता चमीरा या खेळाडूंना श्रीलंकन संघात संधी देण्यात आली आहे. त्यांना श्रीलंकेच्या संघासोबत जोडण्यात आले आहे, पण एखादा खेळाडू जखमी झाल्यानंतरच या खेळाडूंना श्रीलंकन संघात संधी देण्यात येणार आहे.
सलग विजयासाठी शर्थ
नेदरलँड्स संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताना आपण लिंबूटिंबू संघ नाही हे दाखवून दिले आहे, पण उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना आणखी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. सलग लढतीत विजय मिळवण्यासाठी हा संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाऊड, कोलिन ॲकरमन या खेळाडूंना अद्याप ठसा उमटवता आलेला नाही.
लंकेचे पारडे जड
श्रीलंका-नेदरलँड्स यांच्यामध्ये आतापर्यंत पाच लढती झाल्या आहेत. या सर्वच लढतींमध्ये श्रीलंकेने विजय मिळवले आहेत. भारतात सुरू असलेल्या विश्वकरंडकाआधी पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या पात्रता फेरीमध्ये श्रीलंकेने दोन वेळा नेदरलँड्सला पराभूत केले हे विशेष. त्यामुळे इतिहासावर नजर टाकल्यास श्रीलंकेचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.