neeraj chopra storms into world championships final with 88 77m throw qualifies for paris olympics DP Manu Kishore Jena in final sakal
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज ऑलिंपिकसाठीही पात्र; भारताचे डीपी मनू, किशोर जेनाही अंतिम फेरीत

भाला ८३ मीटरच्या पलीकडे गेल्याचे दिसताच २५ वर्षीय नीरजने हात उंचावून आनंद व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

बुडापेस्ट : आत्मविश्वासाने तो ‘रनवे‘ वर भाला घेऊन उभा होता.... त्याने धावण्यास सुरुवात केली आणि सरावात ज्याप्रमाणे सहजपणे भाला फेकतो, त्याप्रमाणे भाला भिरकावला. भाला आपल्या निर्धारित मार्गाने थेट ८८.७७ मीटरवर जाऊन थांबला.

हे कुठल्या पुस्तकातील वर्णन नसून जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने प्राथमिक फेरीत केलेल्या कामगिरीचे वर्णन आहे. यामुळे त्याने पहिल्याच फेकीत अंतिम फेरी गाठली. एवढेच नव्हे तर या कामगिरीमुळे तो थेट पॅरिस ऑलिंपिकसाठीही पात्र ठरला. भारताच्या डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही कामगिरीच्या आधारावर १२ खेळाडूंत स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळविण्यासाठी ८३ मीटरचा निकष निश्चित करण्यात आला होता. भाला ८३ मीटरच्या पलीकडे गेल्याचे दिसताच २५ वर्षीय नीरजने हात उंचावून आनंद व्यक्त केला. सर्वप्रथम जर्मनीच्या ज्युलियन वेबरने नीरजचे अभिनंदन केले. त्याचवेळी स्टँडमध्ये असलेल्या नीरजच्या प्रायोजकाच्या टीमने आनंद साजरा करण्यास सुरुवात केली होती.

काही सेकंदातच भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बातमी क्रीडा प्रेमीपर्यंत पोहोचवली. ऑलिंपिक विजेता असलेल्या नीरजची ही यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरीही ठरली.

यापूर्वी मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये त्याने ८८.६७ मीटरची कामगिरी केली होती. ८८ मीटरच्या वर फेक करून एकप्रकारे त्याने प्रतिस्पर्ध्यांना इशाराच दिला आहे. तिसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नीरजने गत स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

नीरजच्याच गटात असलेल्या डीपी मनूने ७८.१० मीटरने सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८१.३१ मीटर अशी फेक करून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यावेळी नीरजने पुढे येत मनूचे अभिनंदन केले. मनूची ही पहिलीच जागतिक स्पर्धा होय.

`अ‘ गटात तिसरे स्थान मिळविणारा २३ वर्षीय मनू अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या १२ खेळाडूंत सहाव्या स्थानावर असून ८०.५२ मीटर अशी सर्वोत्तम फेक करणारा किशोर जेना ९ व्या स्थानावर आहे. जागतिक स्पर्धेच्या इतिहासात एका इव्हेंटच्या अंतिम फेरीत तीन भारतीय असण्याची ही पहिलीच वेळ होय.

नदीम पात्र, पीटर्स, येगो बाहेर

पाकिस्तानचा राष्ट्रकुल विजेता व गतस्पर्धेत पाचव्या स्थानावर असलेल्या अर्शद नदीमने ‘ब'' गटात तिसऱ्या व शेवटच्या प्रयत्नात ८६.७९ मीटर अंतरावर भाला भिरकावून थेट अंतिम फेरी गाठली.

त्यामुळे गुवाहाटी येथे २०१६ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेपासून सुरू झालेली नीरज विरुद्ध अर्शद ही चुरस आता बुडापेस्टमध्येही पाहायला मिळणार आहे. दरम्यान गतविजेता ग्रेनाडा अँडरसन पीटर्स व माजी विजेता केनियाचा ज्युलियस येगो यांना अंतिम १२ खेळाडूंत स्थान मिळविता आले नाही.

  • भालाफेक (पुरुष-अंतिम फेरी)

  • २७ ऑगस्ट

  • रात्री ११.४५ (भारतीय वेळेनुसार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT