टुर्कू (फिनलँड) : आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज होणाऱ्या ऑलिंपिक व जागतिक विजेत्या भारताच्या नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्समध्ये भालाफेकीत प्रथमच सुवर्णपदक जिंकले. त्याने ८५.९७ मीटर अंतरावर भाला फेकत वर्चस्व सिद्ध केले. त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी असे चित्र निर्माण करणाऱ्या जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगला सातव्या (७९.८४ मीटर) स्थानावर समाधान मानावे लागले.
यात आठ दिग्गज भालाफेकपटूंचा सहभाग होता. त्यात ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि त्रिनिदादचा केशॉर्न वॉलकट या दोन माजी विश्वविजेत्याचा समावेश होता. त्यांना अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळाले. फिनलंडच्या केरानेनला दुसरे व ऑलिव्हर हेलँडरला तिसरे स्थान मिळाले. नीरजने ८३.६२ मीटरने सुरुवात केली. त्यानंतर ८३.४५ व तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ मीटर अशी फेक केली. तिन्ही प्रयत्नानंतर तो आघाडीवरच होता.
चौथ्या प्रयत्नात फिनलंडच्या टोनी केरानेनने ८४.१९ मीटर फेक करीत नीरजवर दबाव वाढविला होता. त्यामुळे नीरज ८२.२१ मीटर अशी फेक करू शकला. पाचव्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. त्यामुळे सहाव्या व शेवटच्या फेरीत चुरस कायम होती. या फेरीत फक्त डेहनिंग व नीरज हे दोघेच यशस्वी फेक करू शकले. नीरजने ८२.९७ अशी फेक केली. दोन वर्षांपूर्वी नीरजला येथे दुसरे स्थान मिळाले होते. नीरजने यंदा दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ तर भुवनेश्वर फेडरेशन करंडकात ८२.२७ मीटर अशी कामगिरी केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.