India at Olympic 2024 Weightlifting Mirabai Chanu - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बुधवारच्या दिवसाची सुरुवात भारतीयांसाठी वाईट बातमीने झाली. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इतिहास घडविणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आले आणि भारताचं हक्काचं पदक गेलं. त्यानंतर अंतिम पंघाल कुस्तीच्या पहिल्याच फेरीत बाद झाली. मिश्र टेबल टेनिस गटातही भारताच्या पदरी निराशा आली. दिवसाचा शेवट गोड होईल अशी अपेक्षा होती. भारोत्तोलन मीराबाई चानूवर नजरा होत्या, परंतु तिने निराश केले.
मणिपूरच्या मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून विक्रमाला गवसणी घातली होती. मीराबाईने स्नॅच प्रकारात ८७ किलो व क्लीन अँड जर्कमध्ये ११५ अशा एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक नावावर केले. क्लीन अँड जर्कमध्ये ११६ किलो वजन उचलण्याचा ऑलिम्पिक विक्रम मीराबाईच्या नावावर आहे.
४ फुट ११ इंच उंची आणि ४९ किलो वजन असलेली मीराबाई तिच्या वजनापेक्षा २४४ पटीने जास्त भार उचलते. यात तिला गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता असते. ESPN ने दिलेल्या आकडेवारीनुसार मिराबाई ९५ ते १३० किलो वजन उचलण्याचा ५ सेटमध्ये सराव करते आणि प्रत्येकी वजनाचे ती ५-५ सेट मारते. उदाहरण - ९५ किलोचे ५ सेट + १०० किलोचे ५ सेट + ११० किलोचे ५ सेट + १२० किलोचे ५ सेट + १३० किलोचे ५ सेट अशी ती एका स्क्वॉटमध्ये २७७५ किलो वजन उचलते.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चिनच्या होयू झिहूईचे आव्हान पॅरिसमध्ये मीराबाईला परतवायचे होते. चीनी खेळाडूच्या नावावर २१० किलो वजन उचलण्याचा ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे. होयूने स्नॅच प्रकाराच्या पहिल्या प्रयत्नात ९० किलो वजन उचलले, तर मिराबाईने ८५ किलो.. थांयलंडची सुरोदचाना खाम्बाओ ही ( ८६ किलो) भारतीय खेळाडूच्या पुढे होती. डॉमिनिकन रिपब्लिकच्या बीट्रिझ पिरोननेही ८५ किलो भार उचलला. या दोघींनी दुसऱ्या प्रयत्नात ८८ किलो लक्ष्य समोर ठेवले आणि दोघी अपयशी ठरल्या. मिराने तिसऱ्या प्रयत्नात ८८ किलो वजन उचलले. होयू ८९ किलोसह आघाडीवर होती आणि तिला रोमानियाच्या व्हॅलेंटिना कॅम्बेइ ( ९३ किलो) हिच्याकडून टक्कर मिळाली... स्नॅच प्रकारात मिराबाई ८८ किलोसह तिसऱ्या स्थानावर राहिली...
रोमानियाची कॅम्बेइ क्लीन अँड जर्कमध्ये १०६ किलो वजन उचलून सर्वाधिक १९९ भारासह आघाडीवर होती. मीराबाईने पहिला प्रयत्न १११ किलोचा ठेवला होता आणि तिच्यासमोर होयू व खाम्बाओ यांचे आव्हान होते. या दोघींनी ११० किलोचे लक्ष्य ठेवले होते. होयूने पहिल्याच प्रयत्नात ११० किलो भार उचलून १९९ किलो वजनासह अव्वल स्थानाकडे कूच केली. कॅम्बेइने दुसऱ्या प्रयत्नात ११० किलो भार उचलला आणि २०३ किलो वजनासह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे मिराबाईवरील दडपण वाढत चालले होते.
मीराबाईने क्लीन अँड जर्कमधील तिच्या पहिल्या प्रयत्नासाठी पुरेसा वेळ घेतला, परंतु १११ किलोचा भार खांद्यावर उचलल्यानंतर तिला तो दोन्ही हातांनी डोक्याच्या वर नेण्यात अपयश आले. पण दुसऱ्या प्रयत्नात तिने १११ किलो भार उचलून १९९ किलो वजनासह तिसऱ्या स्थानी झेप घेतली. थायलंडच्या खाम्बाओने तिच्या दुसऱ्या प्रयत्नात ११२ किलो वजन उचलून एकूण २०० किलो वजनासह दुसऱ्या स्थानावर कूच केली. कॅम्बेईने ११२ किलो वजन उचलून २०५ किलो वजनासह सुवर्णपदकावर दावा सांगितला.
सर्वांच्या नजरा मीराबाईवर खिळल्या होत्या आणि तिने तिसऱ्या प्रयत्नासाठी ११४ किलोचे आव्हान समोर ठेवले. पण तिला हा भार पेलवला नाही आणि एकूण १९९ किलोसह तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मींराबाईचे पदक हुकले. होयूने तिसऱ्या प्रयत्नात ११७ किलो वजन उचलून एकूण २०६ किलो वजनाचा ऑलिम्पिक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदकही नावावर केले. कॅम्बेई २०५ किलो वजनासह रौप्यपदक आणि खाम्बाओ २०० किलोसह कांस्यपदक घेऊन गेल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.