आयपीएलसाठी पंजाबशी केले पुण्याने ट्रेडिंग
पुणे - आयपीएलच्या शेवटच्या मोसमात उच्च महत्त्वाकांक्षेने सहभागी होणार असल्याचे रायझिंग पुणे सुपरजायंट्सने पुन्हा एकदा दाखवून दिले. मुंबईचा एक्स्प्रेस वेगाचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याला पुण्याने करारबद्ध केले. त्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबशी ट्रेडिंग करण्यात आले.
गेल्या मोसमात शार्दूलला पंजाबकडून एकाच सामन्यात संधी मिळाली. नंतर त्याला मोसमाच्या मध्येच फ्रॅंचायजीने मुक्त केल्याची चर्चा होती. त्याबद्दल त्याने तीव्र निराशा व्यक्त केली होती. सहा मे रोजी त्याने ट्विट केले होते की, पय्याडे स्पोर्टस क्लब या माझ्या क्लबसाठी टी-20 सामना उद्या खेळेन. दोन महिन्यांनी अखेर एका सामन्यात संधी. खरेच आयपीएलमुळे जादू झाली आहे. यातील आयपीएलचा संदर्भ त्याने अर्थातच उपहासाने केला होता.
25 वर्षांच्या या गोलंदाजासाठी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मैदान लकी ठरले आहे. गेल्या मोसमात मुंबईने अंतिम फेरीत सौराष्ट्राला हरवून रणजी करंडक जिंकला. त्यात पहिल्या डावात तीन, तर दुसऱ्या डावात पाच विकेट अशी कामगिरी शार्दूलने केली. दुसऱ्या डावात त्याने सौराष्ट्राचा हुकमी एक्का चेतेश्वर पुजारा याला बाद केले होते. शार्दूलने निम्मा संघ गारद केल्यामुळे मुंबईने अनपेक्षितपणे तिसऱ्याच दिवशी रणजी करंडक जिंकला होता. 2014-15 मध्ये त्याने 20.81च्या सरासरीने 48, तर त्यानंतरच्या मोसमात 11 सामन्यांत 41 विकेट घेतल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर दूरध्वनीवर संपर्क साधला असता शार्दूल म्हणाला की, संधी मिळाली तर मी ठसा उमटविण्यासाठी सर्वस्व पणास लावेन. मला संधी मिळेल अशी आशा आहे. गेल्या मोसमातील घडामोडींमुळे दडपण असेल का, याविषयी तो म्हणाला की, मी याकडे एक आव्हान म्हणून पाहात आहे. टी-20 क्रिकेट, चार दिवसांचे क्रिकेट वेगळे असते.
पुण्यातील खेळपट्टी चांगली आहे, पण त्यावर विकेट मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असेही त्याने नमूद केले.
जिगरबाज असल्याने उत्सुकता
रायझिंग पुणे सुपरजायंट्सने भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार धोनीला हटवून स्टीव स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपविली आहे. इंग्लंडचा जिगरबाज अष्टपैलू बेन स्टोक्स यालाही विक्रमी किंमत मोजून टिपले. शार्दूलचे ट्रेडिंग केल्यामुळे त्याला अंतिम संघात संधीची दाट शक्यता आहे. मुंबईकर क्रिकेटपटूंची जिगर शार्दूलकडे आहेच. त्यामुळे त्याच्या कामगिरीविषयी उत्सुकता असेल.
|