PCB Chairman : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून झका अश्रफ यांचे नाव आधीच चर्चेत होते. आता त्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेत पीसीबीची जबाबदारी झका अश्रफ यांच्याकडे सोपवली आहे. झका अश्रफ आता 10 सदस्यीय पीसीबी व्यवस्थापन समितीचे प्रमुख असतील. मात्र, सध्या झका यांना केवळ 4 महिन्यांसाठी पीसीबीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
पीसीबीच्या नवीन व्यवस्थापन समितीची लाहोरमध्ये 6 जुलै रोजी पहिली बैठक होणार आहे, ज्यामध्ये ते पाकिस्तान क्रिकेट आणि पुढील रणनीतीशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. झका अश्रफ हे गेल्या महिन्यातच PCB चेअरमनच्या खुर्चीवर बसणार होते, पण त्यानंतर त्यांच्या दाव्याला देशातील अनेक कोर्टात आव्हान दिल्याने PCB ला निवडणूक पुढे ढकलावी लागली होती.
झका अश्रफ यांना पाकिस्तान पीपल्स पार्टीचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत पीसीबीशी संबंधित मुद्द्यांवर ते जो काही निर्णय घेतील, त्याला पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची मान्यता घ्यावी लागेल. पाकिस्तानी पंतप्रधान पीसीबी अध्यक्षांचे मार्गदर्शक म्हणून काम करतील.
पीसीबी व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट असलेल्या 10 सदस्यांमध्ये कलीम उल्लाह खान, अशफाक अख्तर, मुस्सादिक इस्लाम, अजमत परवेझ, झहीर अब्बास, खुर्रम सुमरो, ख्वाजा नदीम, मुस्तफा रामदे आणि झुल्फिकार मलिक यांच्या नावांचा समावेश आहे.
पीसीबी समितीच्या या नवीन सदस्यांव्यतिरिक्त सरकारने नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांचीही नियुक्ती केली आहे. पीसीबीचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त आता सुप्रीम कोर्टाचे वकील महमूद इक्बाल असतील, जे अहमद शहजाद फारूख राणा यांची जागा घेतील.
झका अश्रफ हे यापूर्वी पीसीबीचे अध्यक्ष राहिले आहेत. 2011 मध्येही ते या पदावर विराजमान झाले होते. 2013 मध्ये त्यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे सांगत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना या पदावरून हटवले होते. त्यानंतर नजम सेठी यांना पीसीबीचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले.
मात्र, वर्षभरानंतर त्यांना पुन्हा पीसीबीचे अध्यक्षपद मिळाले. या सगळ्या घडामोडींदरम्यान 2012 मध्ये अश्रफ यांना आशियाई क्रिकेट परिषदेच्या विकास समितीचे अध्यक्षही बनवण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.