India in Paris Olympic 2024 Day 8 results: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आठव्या दिवसाचे खेळ शनिवारी खेळले गेले. भारतासाठी हा दिवस खरंतर थोडा निराशेचा राहिला. मनू भाकरला तिसऱ्या पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली, तर दीपिका कुमारीलाही इतिहास रचता आला नाही. एकूणच हा दिवस भारतासाठी कसा राहिला, याचा आढावा घेऊ.
नेमबाजीमध्ये शनिवारी मनू भाकर २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत सामील झाली होती. तिचं पदक थोडक्यात हुकलं. अंतिम फेरीत हंगेरीच्या कॅमिलीबरोबर झालेल्या शुटऑफमध्ये तिला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे ती चौथ्या क्रमांकावर राहिली.
याशिवाय पुरुषांच्या स्किट क्वालिफायर्समध्ये अनंतजीत सिंग २४ व्या क्रमांकावर राहिला. या प्रकारातील अव्वल ६ खेळाडूंनाच अंतिम फेरी गाठता आली.
तसेच महिलाच्या स्किट क्वालिफायर्सच्या पहिल्या दिवशी भारताची महेश्वरी चौहान ८ व्या क्रमांकावर आहे, तर रिझा धिल्लोन २५ व्या क्रमांकावर आहे.
गोल्फमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारातील शुनिवारी तिसरी फेरी झाली. या फेरीत भारताचा शुभंकर शर्मा खाली घसरला असून आता ३४ व्या क्रमांकावर राहिला, तर गगनजीत भुल्लरने प्रगती केली असून तो आता ४८ व्या क्रमांकावर आहे. आता रविवारी चौथी फेरी होईल.
तिरंदाजीत आज महिलांचे वैयक्तिक सामने झाले. यामध्ये भारताची दीपिका कुमारी आणि भजन कौर सहभागी झाले होते. मात्र दोघींनाही पदकापर्यंत पोहचला आले नाही. त्यामुळे भारताचे तिरंदाजीतील आव्हानही संपुष्टात आले.
१८ वर्षीय भजन कौरला उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या डायनंदा कोइरुनिसाविरुद्ध शुटऑफमध्ये ५-६ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिचे आव्हान संपले.
त्याचबरोबर अनुभवी दीपिका कुमारीने जर्मनीच्या मिचेल क्रोपेनला ६-४ फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला अटीतटीच्या सामन्यात कोरियाच्या स्युयॉन नाम हिने ४-६ अशा गुणांच्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे तिचेही आव्हान संपले.
महिलांच्या डिंघीमध्ये नेत्रा कुमनन सहाव्या शर्यतीनंतर २० व्या क्रमांकावर राहिली. तसेच पुरुषांच्या डिंघीमध्ये विष्णू सर्वनन सहाव्या शर्यतीनंतर १३ व्या क्रमांकावर राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.