Paris Olympic IND vs GRB Live Hockey - भारत-ग्रेट ब्रिटन यांच्यातला हॉकीतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. ग्रेट ब्रिटनच्या आक्रमणासमोर पी आर श्रीजेश ( PR Shreejesh) भारतासाठी ढाल बनून उभा राहिला. भारताला १७व्या मिनिटाला अमित रोहिदासला ( Amit Rohidas) रेड कार्डमुळे उर्वरित सामन्यात १० खेळाडूंसह ग्रेट ब्रिटनला टक्कर द्यावी लागली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ( Harmanpreet Singh) पुन्हा गोल करून भारताला आघाडीवर ठेवले. पण, ग्रेट ब्रिटनकडून त्याला उत्तर मिळाले. मात्र त्यानंतर भारताच्या बचावफळीने जबरदस्त कामगिरी करून सामना १-१ असा बरोबरीत सोडवला आणि त्यामुळे मॅच पेनल्टी शूट आऊटमध्ये गेली.
ग्रेट ब्रिटन वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळताना दिसले आणि त्यांनी पहिल्या पाच मिनिटांत आक्रमक खेळ करताना दोन पेनल्टी कॉर्नर कमावले. पण, भारताच्या अमित रोहिदासने सुरेख बचाव केला. त्यानंतर पी आर श्रीजेशने ओपन प्लेमधून येणारा गोल अडवून ग्रेट ब्रिटनला आश्चर्यचकित केले. नवव्या मिनिटाला श्रीजेशने आणखी सुरेख बचाव केला. ११व्या मिनिटाला श्रीजेशने गोलजाळीत जाणाऱ्या चेंडूला शेवटच्या क्षणाला स्टीकने बाहेर फेकले आणि त्याचं हे कौशल्य पाहून ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनाही धक्का बसला. भारताला पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या दोन मिनिटांत ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यावर गोल करण्यात ते अपयशी ठरले.
भारतीय संघाची बचावफळी दुसऱ्या हाफमध्ये कमकुवत झाली... कारण १७व्या मिनिटाला अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवून बाहेर केले गेले. ( India play with 10 men) रोहिदासच्या स्टीकने ब्रिटनचा खेळाडू जखमी झाला. हा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला. पुढच्याच मिनिटाला अभिषेकने गोलची संधी बनवली होती, परंतु थोडक्यात हुकला. अमितच्या गैहरजेरीत ब्रिटनचा कॉर्नरवरून आलेला प्रयत्न विवेक प्रसादने रोखला. २२ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी ब्रिटनच्या गोटात गोंधळ निर्माण केला आणि पण, गोलरक्षकाच्या पॅडच्या खाली चेंडू दबल्याने भारतीय खेळाडूंना गोल करता आला नाही. मात्र, कॉर्नर मिळवण्यात यश आले. त्यावर हरमनप्रीत सिंगने भन्नाट स्ट्रोक खेळून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण, २७व्या मिनिटाला मॉर्टन ली याने अप्रतिम मैदानी गोल करून ब्रिटनला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
एक खेळाडू कमी असूनही भारतीय संघाचा खेळ प्रशंसनीय झाला. त्यांनी ब्रिटनच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले. ३४व्या मिनिटाला नशिबाची भारताला साथ मिळाली आणि ब्रिटनचा गोल पोस्टच्या तोंडावरून थोडक्यात अयशस्वी झाला. त्यात श्रीजेशने सलग दोन कॉर्नर रोखून भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले. ब्रिटनचे खेळाडू मात्र रडीचा डाव खेळायला लागले आणि त्यांच्याकडून स्लेजिंग सुरू झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाचीही पाहायला मिळाली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा बचाव भक्कम राहिला.
भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सामने हे शेवटच्या मिनिटाला गोल करून जिंकले आहेत. त्यामुळे ही शेवटची १५ मिनिटे उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. भारताकडून जोरदार आक्रमण होत राहिले, परंतु कुठेतरी १ खेळाडूची उणीव त्यांना त्रास देत होती. ५६व्य मिनिटाला श्रीजेशने आणखी एक अविश्वसनीय बचाव करून ब्रिटनचा विजयी गोल रोखला. हार्दिकने शेवटचा प्रयत्न रोखल्याने मॅच पेनल्टी शूट आऊटमध्ये गेली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.