India at Paris Olympic 2024: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे १९ वर्षीय मनु भाकरला पदार्पणात पदक जिंकता आले नव्हते... त्या अपयशाने ती खचली होती, परंतु प्रशिक्षक जस्पाल राणा यांच्यासोबत तिने सराव केला अन् पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. २२ वर्षांची मनु ही एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी स्वातंत्र्य भारतानंतरची ती पहिलीच खेळाडू ठरली. शिवाय भारताच्या एकाही महिला खेळाडूला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत असा पराक्रम करता आलेला नाही. मनुचा ऑलिम्पिकमधील प्रवास इथेच संपलेला नाही, ती आणखी एका पदकाच्या शर्यतीत आहे.
मनु भाकरने मंगळवारी सरबजोत सिंग याच्यासह मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांचा सामना ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियन जोडीशी झाला. भारतीय जोडीने १६-१० अशा फरकाने हा सामना जिंकून कांस्यपदक नावावर केले. तत्पूर्वी, मनुने १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी एका प्रकारात पदकासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. ती २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात भाग घेणार आहे. २ ऑगस्टला २५ मीटर एअर पिस्तुल प्रकाराची पात्रता फेरी दुपारी १२.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. जर यात मनु पात्र ठरली, तर ती ३ ऑगस्टला दुपारी १ वाजता पदकाच्या शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
दरम्यान, भारताचा रोईंगपटू बलराज पनवार याला रेपेचेज राऊंडमध्ये थोडक्यासाठी अपयश आले. पुरुष एकेरी स्कल गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तो पाचवा आला आणि अव्वल तीन खेळाडूच पुढील शर्यतीसाठी पात्र ठरले. मनुच्या दोन कांस्यपदकानंतर भारत पदक तालिकेत २७व्या क्रमांकावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.