पॅरिस : गेल्या काही ऑलिंपिक स्पर्धांतून लक्षवेध प्रगती करत असलेल्या भारतीयांकडून या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतही मोठ्या अपेक्षा आहे. आतापर्यंत कधीही न मिळालेली दोन अंकी पदके यावेळी मिळवण्यासाठी आशा उंचावल्या आहेत.
गत टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत एका सुवर्णासह पाच पदके भारताला मिळाली होती. यावेळी किमान १० पदकांचे लक्ष्य बाळगले आहे. या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे ११७ खेळाडू सहभागी होत आहेत. यातील अर्ध्याहून अधिक खेळाडू मिळून ॲथलेटिक्स (२९), नेमबाजी (२१) आणि हॉकी (१९) खेळातील आहेत.
या तीन खेळांतील मिळून ६९ खेळाडूंपैकी ४० जण प्रथमच ऑलिंपिकमध्ये खेळणार आहेत. कुस्तीतील झालेल्या वादाचा अपवाद वगळता इतर सर्व खेळातील खेळाडूंनी देशात असो वा परदेशात जोरदार तयारी केली आहे. आता या मेहनतीचे रूपांतर पदकात करण्याची वेळ आली आहे.
नीरज चोप्रा
गत स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून यंदाही पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे. जागतिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरजला आतापर्यंत ९० मीटर लांब भाला फेकता आलेला नाही. या ऑलिंपिक स्पर्धेत त्याला ९० मीटरचे आव्हान मिळू शकते.
पी. व्ही. सिंधू
बॅडमिंटनची फुलराणी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या पी. व्ही. सिंधूकडे २०१६ रिओ आणि २०२१ टोकियो अशी दोन ऑलिंपिक पदके आहेत. त्यामुळे यंदाही तिच्याकडून पदकांची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत तिला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. काही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा अडथळा तिला पार करता आलेला नाही; परंतु यावेळची ऑलिंपिक अपवाद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
बॅडमिंटनच्या दुहेरीत रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी अव्वल स्थानावर राहिलेले आहेत. त्यांच्याकडे सुवर्णपदक मिळवण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडून पदकाची हमखास खात्री आहे.
हॉकी ः गत स्पर्धेत ब्राँझपदक मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाकडून यंदाही अपेक्षा आहे. मात्र, गटातील स्पर्धेत त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल. विशेष म्हणजे, पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात यश मिळवावे लागेल.
नेमबाजी ः यंदा प्रथमच नेमबाजीत २१ खेळाडू सहभागी होत आहेत. गत स्पर्धेत नेमबाजांनी अपेक्षाभंग केला होता. यावेळी चित्र बदलू शकेल. मनू भाकर आणि सौरभ चौधरी, तसेच दिव्यांश पनावर आणि इलावेनील वलारिवन, स्किट प्रकारात कौर समरा आणि संदीप सिंग यांच्याकडूनही अपेक्षा आहेत.
कुस्ती ः गेल्या चार ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती खेळातून भारताला सातत्याने पदके मिळालेली आहेत. ही परंपरा यावेळी कायम राहण्याची अपेक्षा आहे; परंतु देशात कुस्तीच्या आखाड्याबाहेर झालेल्या वादाचा परिणाम राष्ट्रीय सराव शिबिर न होण्यावर झाला. यावेळी अंतिम पंघाल, अंशू मलिक यांच्याकडून अपेक्षा आहेत.
इतर ः तिरंदाजीत अद्याप एकही पदक मिळालेले नाही; पण यावेळी अपेक्षा अधिक आहेत. टेबल टेनिस संघही आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकेल.
बॉक्सिंग ः अनुभवी बॉक्सर निखत झरीन आणि निशांत देव पदक मिळवण्याच्या क्षमतेचे आहेत. निर्णायक लढतीत त्यांनी खेळ उंचावला की पदक निश्चित असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.