पॅरिस : ऑलिंपिकमधील महिला बॉक्सिंगमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीतील वादग्रस्त लढतीत माघार घेणाऱ्या इटलीच्या अँजेला कारिनी हिच्याप्रती सहानुभूती व्यक्त करताना तिला रोख रकमेचे बक्षीस देण्याचे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (आयबीए) ठरविले.
अल्जेरियाच्या इमाने खलिफ हिच्याविरुद्ध महिलांच्या वेल्टरवेट गटात कारिनीला ४६ सेकंदांतच माघार घेतली होती. तिला आता आयबीएकडून ५०,००० डॉलर्स बक्षीस रक्कम मिळेल. अल्जेरियाची इमाने सध्या लिंग वादाच्या केंद्रस्थानी आहे.
तिने इटालियन खेळाडूस जोरदार ठोशांनी जेरीस आणले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने गतवर्षी आयबीएची आंतरराष्ट्रीय मान्यता काढून घेतली आणि नंतर पॅरिस २०२४ मधील बॉक्सिंग स्पर्धेची जबाबदारी आपल्याकडे घेतली.
आयबीएने नमूद केले, की कारिनी हिला ५०,००० डॉलर्स, तिच्या महासंघाला २५,००० डॉलर्स आणि तिच्या प्रशिक्षकाला अतिरिक्त २५,००० डॉलर्स मिळतील. महिला बॉक्सिंगचा ते का गळा घोटत आहेच हेच मला कळत नाही, असे आयबीए अध्यक्ष उमर क्रेमलेव म्हणाले. त्यांनी कारिनीप्रकरणी पुढे सांगितले, की सुरक्षिततेच्या कारणास्तव फक्त पात्र खेळाडूंनीच रिंगमध्ये खेळावे. मला तिघे अश्रू बघवत नव्हते.
अल्जेरियाची खलिफ आणि तैवानची दोन वेळची जागतिक विजेती लिन यू-टिंग यांना पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आली, मात्र २०२३ मधील जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतून आयबीएने त्यांना महिलांच्या स्पर्धांमध्ये पुरुष एक्सवाय गुणसूत्र असलेल्या खेळाडूस प्रतिबंध करणारा पात्रता नियम निकष पूर्ण करू न शकल्याबद्दल अपात्र ठरविले होते.
२५ वर्षीय इमाने खलिफ हिची उपांत्यपूर्व लढतीतील प्रतिस्पर्धी हंगेरीची २३ वर्षीय अॅना लुका हॅमोरी हिलाही ऑलिंपिक्समध्ये महिलांच्या गटात अल्जेरियन खेळाडूचा सहभाग योग्य वाटत नाही. पॅरिस २०२४ मधील खलिफच्या सहभागाविरोधात हंगेरियन बॉक्सिंग असोसिएशनने निषेध नोंदविला आहे आणि यासंदर्भात चर्चा करण्याची विनंती हंगेरियन ऑलिंपिक समितीने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.