पॅरिस : साखळी फेरीत शानदार कामगिरी करणारा भारतीय पुरुष हॉकी संघ आज (ता. ४) पॅरिस ऑलिंपिकमधील उपांत्यपूर्व लढतीत ग्रेट ब्रिटनचा सामना करणारा आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकाची कमाई करीत पदकाचा दुष्काळ संपवणारा भारतीय संघ ऑलिंपिकमध्ये सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने ब गटामध्ये १० गुणांसह दुसरे स्थान पटकावले. न्यूझीलंड, आयर्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांना पराभूत करण्याची किमया करून दाखवली. बेल्जियमकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तसेच अर्जेंटिनाविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले.
टोकियो ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाच्या हॉकी संघाने रौप्यपदक पटकावले होते. भारतीय हॉकी संघाने साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत याच ऑस्ट्रेलियन संघाला ३-२ असे पराभूत केले. भारतीय हॉकी संघाच्या या विजयाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
या विजयात भारतीय हॉकी संघातील मधल्या व आक्रमक फळीतील खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, गुर्जंत सिंग व सुखजीत सिंग यांचा शानदार खेळ लक्षवेधक ठरला. त्यांच्याकडून आता याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.
भारतीय हॉकी संघाच्या भरीव कामगिरीत कर्णधार हरमनप्रीत सिंग याचा मोलाचा वाटा आहे. त्याने आतापर्यंत सहा गोल केले आहेत. पेनल्टी कॉर्नरवर त्याच्याकडून हमखास गोलाची आशा करता येऊ शकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक गोवर्स याने सर्वाधिक सात गोल केले आहेत. त्यानंतर हरमनप्रीतचा क्रमांक लागतो.
भारतीय हॉकी संघाने यंदाच्या ऑलिंपिकमध्ये कात टाकली आहे. ग्रेटब्रिटनच्या संघाने अ गटामधून आठ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. अर्थात त्यांच्याकडूनही समाधानकारक कामगिरी झालेली आहे.
ऑलिंपिकमध्ये कामगिरीच्या आधारावर भारतीय हॉकी संघाचे पारडे जड आहे असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात क्रमवारीवर नजर टाकता वेगळे चित्र दिसून येईल. भारतीय हॉकी संघ पाचव्या स्थानावर असून ग्रेटब्रिटनचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे उद्या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंजही पाहायला मिळू शकते.
भारत - ग्रेट ब्रिटन
बेल्जियम - स्पेन
जर्मनी - अर्जेंटिना
ऑस्ट्रेलिया - नेदरलँड्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.