पॅरिस : ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आयोजन समितीला परदेशी खेळाडू आणि संघातील सदस्यांकडून क्रीडा नगरीत आणि केंद्रांवर मूलभूत सुविधांच्या अभावामुळे तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे.
नाव उघड न करण्याच्या अटीवर एका क्रीडापटूने सांगितले की, ‘‘जेव्हा खेळाडू त्यांच्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन क्रीडा नगरीत आले, तेव्हा त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध नव्हते. जेव्हा आम्ही यासंदर्भात आयोजन समिती अधिकारी किंवा स्वयंसेवक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्यापाशी उत्तर नव्हते. आयोजन समितीने या मूलभूत बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे,’’ असे या खेळाडूने सांगितले.
आणखी एक खेळाडू म्हणाला की, ‘‘आम्हाला आमच्या गरजा विशद करणे कठीण ठरत आहे. एका स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूलाही ज्याचे मी नाव उघड करणार नाही, त्यालाही जेवण मिळाले नाही. आमच्यासाठी हे धक्कादायक आहे.’’
ग्रेट ब्रिटन पथकाच्या प्रमुखाने पहिल्या दिवसापासून योग्य अन्नाच्या अभावाचा मुद्दा उपस्थित केला. ग्रेट ब्रिटनच्या कितीतरी खेळाडूंना रात्रीच्या जेवणाविना राहावे लागले. त्यामुळे स्पर्धेच्या बाकी कालावधीसाठी त्यांच्या प्रथक प्रमुखाला खेळाडूंच्या स्वयंपाक गरजा पूर्ण करण्यासाठी तातडीने मायदेशातून स्वयंपाकी पाचारण करणे भाग पडले.
ऑलिंपिक उद्घाटन समारंभात लिओनार्दो दा विंची यांचे चित्र ‘द लास्ट सफर’संदर्भात ‘ड्रॅग क्वीन्स’च्या सादरीकरणामुळे २०२४ पॅरिस ऑलिंपिकला टीकेला सामोरे जावे लागले. यामुळे पुष्कळ लोक भडकले असून त्यांच्यामते हे अनादर करणारे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.
फ्रान्समधील कॅथलिक चर्चने एक्स अकाउंटवरून आपली तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘‘दुर्दैवाने या समारंभात ख्रिश्चन धर्माची खिल्ली उडविणारी दृश्ये होती. ज्याबद्दल आम्हाला खेद आहे,’’ असे नमूद करण्यात आले. यासंदर्भात नंतर आयोजकांना माफी मागावी लागली.
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यांनीही उद्घाटन सोहळ्यावर नासपंती व्यक्त केली. ‘‘या कार्यक्रमात खेळाडूंवर विशेष झोत नव्हता,’’ असे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, ‘‘उद्घाटन सोहळ्यात आयोजकांनी खेळाडूंवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे होते. हा क्रीडापटूंचा सोहळा आहे. खरं म्हणजे त्यांनी खेळाडूंना अधिक महत्त्व द्यायला हवे होते, मात्र त्यांच्यावर काही सेकंदच झोत राहिला, अन्यथा बाकी सर्व चांगले होते.’’
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीलाही (आयओसी) लाजिरवाण्या घटनेस सामोरे जावे लागले. उद्घाटन सोहळ्यात आयफेल टॉवरसमोरील परेड ऑफ नेशन्स मार्गावर सर्व प्रतिनिधींसमोर आयओसी ध्वज उलटा उंचावण्यात आला. आयओसीच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांसाठी ही बाब निश्चितच मजेशीर नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.