पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्पर्धांबरोबर चर्चा होतेय ती ऑलिंपिक स्वयंसेवकांचे आणि पदक समारंभातील प्रेझेंटर्सच्या गणवेशांची. कारण हे गणवेश फ्रेंच संस्कृती, स्थैर्य, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता यांचा विचार करून बनवण्यात आले आहेत. या गणवेशात टी शर्ट, ट्राऊझर्स, बूट, जॅकेट आणि बॅगचा समावेश आहे.
या ऑलिंपिकसाठी जगभरातून जवळपास ४५ हजार स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. त्यांचे गणवेश डेकॅथलॉनने डिझाइन केले आहेत. या गणवेशांचा प्रमुख रंग ‘ओपेरा ग्रीन’ हा आहे, जो पॅरिसच्या ‘ओपेरा गार्नियर’ या एतिहासिक वास्तूच्या छताच्या रंगाने प्रेरित आहे. तसेच, हा रंग पॅरिसच्या सांस्कृतिक वारशाचाही भाग आहे आणि या रंगामुळे गणवेश आकर्षकही दिसतो.
प्रत्येक स्वयंसेवकांसाठी एकूण १५ वस्तूंचा सेट मिळतो, ज्यात गणवेशासह दोन बॅग, सॉक्स, टोपी यांचाही समावेश आहे. या सगळ्या वस्तू अनेक वेगवेगळ्या पर्यावरण घटकांनी बनलेल्या आहेत. स्वयंसेवक कोणत्याही वातावरणात आरामदायी आणि कार्यक्षम राहू शकतील, हाच यामागचा उद्देश आहे.
या गणवेशातील निम्म्याहून अधिक वस्तू फ्रान्समध्येच तयार करण्यात आल्या आहेत. टी शर्ट आणि सॉक्स हे इथल्या स्थानिक आणि छोट्या उत्पादकांकडून तयार करून घेण्यात आलेले आहेत. जेणेकरून पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचून हे सगळं उत्पादन करण्यात येईल.
डेकॅथलॉनच्या जनरल डायरेक्टर बार्बरा मार्टिन या गणवेशांच्या डिझाइनबद्दल अभिमानाने सांगतात की, ‘‘आम्ही हे गणवेश तयार करताना ऑलिंपिकच्या मूळ हेतूला साजेसे मटेरियल वापरून गणवेश तयार केले आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल तर राखला गेलाच; पण परंपरा आणि फॅशन यांचाही समतोल साधता आला.’’
ऑलिंपिक स्वयंसेवक आणि पदक समारंभातील प्रेझेंटर्स यांचे गणवेश वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. हे गणवेश फ्रान्सचा लक्झरी ग्रुप लुई व्हितॉं या कंपनीने तयार केले आहेत. गणवेशांसोबतच पदकांसाठीचे ट्रे ही लुई व्हितॉंनं तयार केले आहेत.
हे गणवेश फ्रान्सच्या १८व्या शतकातली फॅशन आणि ऐतिहासिक वारसा शाही पेहरावाचा फिल दाखवणारे आहेत. या गणवेशांच्या डिझाइनमध्ये फ्रेंच संस्कृतीचा ठसा स्पष्टपणे दिसतो. गणवेशांसोबतच खास डिझाइन केलेल्या ट्रेजमुळे पदक सादरीकरणाला एक वेगळीच शोभा मिळते.
थोडक्यात, स्वयंसेवक आणि पदक समारंभातील सादरकर्त्यांचे गणवेश केवळ कार्यक्षमतेपुरते मर्यादित नाहीत तर फ्रेंच संस्कृती आणि टिकावूपणाच्या मूल्यांचाही यात विचार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुंदर मिलाफ आहे, ज्यामुळे हे गणवेश वेगळे ठरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.