भारतीयांना खेळाडुंच्या कामगिरीपेक्षा त्यांची जात शोधण्यात रस
Tokyo Olympics 2020 : नेटकऱ्यांना कोणत्या गोष्टीची कधी हुकी येईल सांगता येत नाही. सध्याच्या घडीला ऑलिम्पिक स्पर्धेचा माहोल आहे. देशासाठी पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. जगातील मानाच्या स्पर्धेत अपयशी ठरलेल्या खेळाडूंनाही धीर देऊन त्यांना मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व सकारात्मकतेत काही नेटकऱ्यांनी वैचारिक पातळीची हद्दपार केलीये.
महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यातील नेटकऱ्यांनी खेळाडूंची जात सर्च करण्याचा ट्रेंड निर्माण केलाय. मागील काही दिवसांत पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक यासारख्या खेळाडूंची जात कोणती यासाठी गुगलवर सर्च वाढले आहेत. सध्याच्या घडीला हा एक कळीचा मुद्दाच ठरताना दिसतोय. खेळाडूंची जात सर्च करण्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर चर्चा करायला हवी. ऑलिम्पिक स्पर्धेसह इतर स्पर्धेत खेळाडू देशाचे नाव उंचावण्यासाठी जीवाचे रान करतात. पण समाजातील वैचारिक बांधिलकी विसरलेले काहीजण पातळी ओलांडून नको त्या गोष्टीवर चर्चा करण्यात धन्यता मानतात.
trend.google.com वरील माहितीनुसार, सिंधूने ज्या दिवशी पदकावर नाव कोरले त्या दिवशी गुगलवर नेटकऱ्यांनी pv sindhu caste हा शब्द सर्वाधिक सर्च केला. पदक जिंकल्यानंतही नेटकरी कामगिरीपेक्षा तिच्या जातीत अडकून पडले आहेत. सिंधूची जात शोधणाऱ्यांमध्ये सर्वाधिक नेटकरी आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमधील आहेत.
2016 पासून गुगलवर सर्च केली जातेय सिंधूची जात...
गुगल ट्रेंड्स ग्राफनुसार, pv sindhu caste हा कीवर्ड ऑगस्ट 2016 मध्ये सर्वात पहिल्यांदा सर्च करण्यात आला. त्यावेळी सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पदकाची कमाई केली होती. सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवल्यानंतही तोच ट्रेंड पुन्हा पाहायला मिळतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागील पाच वर्षांत यात 90 टक्के नेटकऱ्यांची भर पडलीये. सिंधूची जात शोधण्याासाठी नेटकरी pv sindhu caste, pusarala caste, pusarla surneme caste असे सर्च करताना दिसतात.
सामाजिक कार्यकर्ते दिलीप मंडल यांनी नेटकऱ्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. ते म्हणतात, आज ज्या लोकांनी गुगलवर हे केले ते गरीब, ग्रामीण लोक नाहीत. ज्या लोकांकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा इंटरनेट डेटा टाइप करण्याचे ज्ञान असेल, असेच लोक यात आहेत. एखाद्या खेळाडूची जात गुगलवर सर्च करण्याची ही पहिलीच घटना नाही. नेटकऱ्यांची ही मानसिकता यापूर्वीही अनुभवायला मिळालीये.
साक्षी मलिकबाबातही घडलीये हिच गोष्ट
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधू सोबत साक्षी मलिकने भारताला पदकाची कमाई करुन दिली होती. तिने कांस्य पदकावर नाव कोरले होते. यावेळी राजस्थान, यूपी आणि दिल्लीतील नेटकऱ्यांनी साक्षी मलिकची जात सर्वाधिक शोधल्याचा प्रकार घडला होता. सातत्याने ही गोष्ट घडताना दिसते.
गुगलच्या आकडेवारीनुसार, जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये sakshi malik caste, malik caste सारखे कीवर्डही टॉप ट्रेंडमध्ये सामील झाले होते. गुगलवर साक्षी मलिकची जात राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सर्वाधिक सर्च केली गेली आहे.
बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांचीही जात शोधली
डिसेंबर 2020 मध्ये गुगलवर pullela gopichand caste टॉप ट्रेंड पाहायला मिळाले होते. खेळाडूंसाठी गोपीचंद यांनी 'ध्यान फॉर स्पोर्ट्स मेडिटेशन सेशन' लॉन्च केले होते. कोरोना महामारीमध्ये खेळाडू घरी बसून निराश होऊ नयेत यासाठी खेळाडूंना मोबाईल अॅपद्वारे ध्यान करण्याचा सल्ला देत होते. यावेळी लोकांनी त्यांच्या जातीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
10 वर्षांपासून तिरंदाज दीपिका कुमारीचाही सुरुय जातीचा शोध
तिरंदाजीमध्ये अव्वलस्थानी असलेल्या दीपिका कुमारी महतोने 2010 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्ण कामगिरी केली. सध्या ती जगातील पहिल्या क्रमांकाची तिरंदाज आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत सरकारने 2012 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. तेव्हापासून लोक गुगलवर तिची जात शोधत आहेत. deepika kumari caste चा कीवर्ड टॉप ट्रेंडमध्ये राहिलाय. तिची जात शोधणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील नेटकरी सर्वाधिक प्रमाणात आहेत.
क्रिकेटमध्ये संजू सॅमसनच्या बाबतीतही हेच घडलं
वर्षभरापासून भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची जात गुगलवर सर्च करत आहेत. वर्षभरात जवळपास 7 वेळा संजू याकारणामुळे गुगलवर ट्रेंडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. संजूची जात शोधणाऱ्यांमध्ये केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील लोक आघाडीवर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.