Suryakumar Yadav : वयाच्या ३०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवची मागील दोन वर्षांमधील कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली आहे. राजकोट येथील टी-२० लढतीत ११२ धावांचा पाऊस पाडत या पठ्ठ्याने भारताला श्रीलंकेवर मालिका विजय मिळवून दिला. या संस्मरणीय खेळीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी संवाद साधताना तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी उशिरा मिळाली. त्यामुळे धावा करण्याची भूक आणखीनच वाढली.
सूर्यकुमार पुढे म्हणाला, मी स्थानिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलो आहे. मुंबई संघासाठी खेळायला नेहमीच आवडते; पण गेल्या काही वर्षांमध्ये मला आव्हानाचा सामना करावा लागला आहे. विपरीत परिस्थितीतही क्रिकेट हे माझे वेड आहे हे मी स्वत:ला वारंवार सांगत होतो. याचमुळे मला यश मिळवता आले आहे, असे तो आवर्जून सांगतो.
सूर्यकुमारने राजकोटमध्ये टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावले. मागील सात महिन्यांतील हे त्याचे तिसरे शतक होय. तीन शतकांपैकी कोणत्या शतकाने सर्वाधिक आनंद झाला, असे विचारले असता तो म्हणाला, एका खेळीची निवड करणे माझ्यासाठी सोपे नाही. आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजी करायला नेहमीच आवडते. गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करता आली आहे. पुढेही त्याचीच पुनरावृत्ती करीन, असा विश्वास त्याने पुढे व्यक्त केला.
झटपट क्रिकेटमध्ये खेळताना (टी-२० व एकदिवसीय) सूर्यकुमार यादवचे काही फटके पूर्वनिर्धारित असतात. यावर तो म्हणाला, अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये पूर्वनिर्धारित फटके खेळावे लागतात. फटक्यांची निवड आधीच करावी लागते; पण गोलंदाजांनी बदल केल्यास आपण इतर फटक्यांसाठीही तयार असायला हवे, असेही तो सांगतो.
सूर्या वि. श्रीलंका सामना
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने राजकोटमधील विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला, सूर्यकुमार वि. श्रीलंका अशीच ही लढत होती. सूर्यकुमार क्षणार्धात लढतीचा नूर बदलून टाकतो. त्याच्या फटक्यांमुळे गोलंदाजांचे मनोधैर्य खच्ची होते, असे हार्दिक नमूद करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.