राजकोट : ऋतुराज गायकवाडचा शतकी झंझावात गुरुवारीही सुरूच राहिला. मध्य प्रदेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत १३६ धावांची खेळी साकारत महाराष्ट्राला दिमाखदार विजय मिळवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडने छत्तीसगडविरुद्धच्या लढतीतही नाबाद १५४ धावांची शतकी खेळी करताना महाराष्ट्राला सलग दुसरा विजय मिळवून दिला. सलग दोन लढतींमध्ये महाविजय संपादन केल्यामुळे महाराष्ट्राचा संघ ‘ड’ गटामध्ये आठ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.
छत्तीसगडकडून मिळालेल्या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्राने अवघे दोन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने १४३ चेंडूंत १४ नेत्रदीपक चौकार व पाच खणखणीत षटकारांसह नाबाद १५४ धावांची खेळी केली. यश नाहरने ५२ धावा फटकावल्या. नौशाद शेखने ३७ धावांची तर राहुल त्रिपाठीने नाबाद २३ धावांची खेळी केली. याआधी अमनदीप खरे (८२) व शशांक सिंग (६३) यांच्या फलंदाजीच्या जोरावर छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७५ धावा केल्या. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने ६७ धावा देत चार मोहरे टिपले. राहुल त्रिपाठीने दोन व तरण ढिल्लोनने एक फलंदाज बाद केला.
विदर्भ, ओडिशा विजयी
मुंबई व ठाणे येथेही विजय हजारे करंडकाच्या लढती खेळविण्यात आल्या. ‘अ’ गटाच्या लढतीत विदर्भाने आंध्रला आठ गडी राखून पराभूत केले. याच गटातील अन्य लढतींत हिमाचल प्रदेशने जम्मू काश्मीरला ६३ धावांनी धूळ चारली. ओडिशाने गुजरातला तीन गडी व तीन चेंडू राखून पराभूत केले. या गटामध्ये विदर्भ व ओडिशा हे संघ प्रत्येकी आठ गुणांसह पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.
संक्षिप्त धावफलक
छत्तीसगड : ५० षटकांत ७ बाद २७५ धावा ः अमनदीप खरे ८२ धावा, शशांक सिंग ६३ धावा, मुकेश चौधरी ४/६७, राहुल त्रिपाठी २/२५ पराभूत वि. महाराष्ट्र ४७ षटकांत २ बाद २७६ धावा ; ऋतुराज गायकवाड नाबाद १५४ (१४ चौकार, ५ षटकार), यश नाहर ५२ (६ चौकार, १ षटकार), अजय मंडल २/४७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.