IND vs AFG : भारताने मायदेशात होत असलेल्या वर्ल्डकपची सुरूवात ही ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयाने केली. मात्र या विजयाला जॉस हेजलवूडने गालबोट लावलं होतं. त्याने भारताची टॉप ऑर्डर शुन्यावर माघारी धाडत भारतीय चाहत्यांच्या मनात धडकी भरवली.
मात्र आज अफगाणिस्तासोबतच्या सामन्यात याच टॉप ऑर्डरने दिवाळीच्या आधीच एक महिना दिवाळी साजरी करत अरूण जेटली स्टेडियमवर तुफान आतशबाजी केली. मात्र या आतशबाजीमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी कुठेतरी झाकोळली गेली.
पाटा खेळपट्टीवर भारताचा टिच्चून मारा
अरूण जेटली स्टेडियमवरील नवीन खेळपट्टीने आपले चरित्रच बदलले आहे. आधी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी आता फलंदाजांच्या वळचणीला जाऊन बसली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजांचे मरणच असते. या मैदानावरील वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांनी मिळून जवळपास 700 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या.
अशा खेळपट्टीवर आज भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत अफगाणिस्तानला 272 धावात रोखले. इथेच भारताने निम्मा नाही तर 75 टक्के सामना जिंकला होता. जसप्रीत बुमराहने तर या पाटा खेळपट्टीवर 10 षटकात फक्त 39 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने 3.89 च्या सरासरीने धावा दिल्या.
वेगवान माऱ्याला फिरकीचीही लाभली साथ
अरूण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टीवरील ही गोलंदाजाची फिगर शतकापेक्षा काही कमी नव्हती. बुमराहला साथ देणाऱ्या हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने देखील आपली चुणूक दाखवली. पांड्या जोडी ब्रेकर ठरला. त्याने मोक्याच्या क्षणी आपल्या कर्णधाराला विकेट काढून दिली.
भारतीय फिरकी गोलंदाजांचे देखील कौतुक करावे तितके थोडे आहे. कारण अशा खेळपट्टीवर विकेट घेणं लांबच राहिलं धावा रोखणंही फार जिकीरचं असतं मात्र कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाने ते सचोटीने करून दाखवलं.
रोहितची वर्चस्ववादी फलंदाजी
भारताचा कर्णधार रोहित शर्मा एकदा का सेट झाला तर तो एकटात विरोधी संघातील 11 खेळाडूंना अंगावर घेतो. आज अफगाणिस्ताविरूद्धच्या सामन्यात देखील त्यानं तेच केलं. पहिल्या सामन्यात भोपळाही न फोडणारा रोहित ट्रोल झाला होता.
मात्र आज त्याने एका मागून एक विक्रम ध्वस्त करत भारत मायदेशात खेळतोय याची जाणीव सर्वांना करून दिली. त्याचा धडाका पाहून भारतीय संघ 20 षटकातच सामना संपवतो की काय अशी चर्चा सुरू झाली. होती.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजी विभागाने रोहित आणि कंपनीचं काम सोपं करून ठेवलं होतं. दव पडलेल्या पाटा खेळपट्टीवर त्यांना फक्त 273 धावा चेस करायच्या होत्या.
मात्र या 273 धावा चेस करताना देखील एक स्टेटमेंट देणं गरजेचं होतं. ते रोहित शर्माने दिलं. त्याने 87 चेंडूत 131 धावांची आक्रमक खेळी करून भारताच्या फलंदाजीची धुरा एकट्याच्या खांद्यावर वाहिली.
संथ सुरूवात करणाऱ्या इशान किशनने 47 धावा केल्या तर विराट कोहलीने देखील 56 चेंडूत 55 धावा करत यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अय्यरनेही 25 धावा करत आपली बॅटिंंग प्रॅक्टिस करून घेतली.
मोहम्मद सिराज : सामन्यात एकच कच्चा दुवा
वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी मोहम्मद सिराजने आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत सातत्यपूर्ण आणि दमदार गोलंदाजी केली होती. त्यामुळेच त्याला मोहम्मद शमीचा अनुभव डावलून संधी देण्यात आली.
मात्र पहिल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात देखील त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. ती खेळपट्टी फिरकीसाठी होती त्यामुळे त्याला फक्त 6 षटकेत टाकण्याची संधी मिळाली. मात्र त्याची लाईन लेंथ थोडी भरकटेली वाटली.
आजच्या अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात देखील खेळपट्टी फार साथ देणारी नव्हती. मात्र जर सिराजने एक टप्पा पकडून गोलंदाजी केली तर त्याचा फायदा नक्कीच झाला असता. परंतु आज सिराजने स्वैर मारा केला. त्याने 9 षटकात तब्बल 76 धावा दिल्या. आजच्या सामन्यात आजच्या सामन्यात भारताला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अजून वाव आहे याचा विचार केला तर नक्कीच ती सिराजची गोलंदाजी असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.