भारतीय संघाचा कर्णधार....सॉरी... भारतीय कसोटी संघाचा कर्णधार गेल्या काही दिवसांपासून धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात तो जर्सीवर असलेल्या नंबर एवढी धावसंख्या करुन परतला. सेंच्युरियनच्या मैदानात किंग कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा शतकी लव्ह मॅटरचं मीटर सुरु करेल, असे वाटत असताना त्याने पुन्हा एकदा निराश केले. विराट हा माणूस आहे आणि तोही आउट होणार हे खरयं...पण किती वेळा त्याच पद्धतीने आउट व्हायच याला काही मर्यादा असायला हव्या. मर्यादित राहण्यासाठी हवे ते नियंत्रण. विराट कोहली स्वत:ला नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरतोय. पाचव्या स्टम्पवरचा बॉल मारयची तो सातत्याने घाई करतो आणि आपल्या पायावर स्वत: कुऱ्हाड मारून घेतो. सेंच्युरियनच्या पहिल्या डावात झाल तेच दुसऱ्या डावात झालं आणि त्याला पाचव्या स्टम्प बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या अति घाईनं पुन्हा पॅव्हेलियनमध्ये माघारी धाडलं.
क्रिकेटच्या मैदानात बॉल सोडणं ही एक कला आहे. जी लोक बॉल सोडतात ती डोक्यावर पडलेली नसतात. ही गोष्ट विराटला सांगण्याइतका तो अपरिपक्व नक्कीच नाही. पण गेल्या काही दिवसांपासून त्याने ज्या पद्धतीने बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद होण्याचा सिलसिला दिसतोय तो त्याच्यासह भारतीय संघाची चिंता वाढवणारा आहे. नव्या वर्षाला सुरुवात होण्याआधी या वर्षाच्या अखेरीस विराट कोहलीच्या आयुष्यात खूप काही घटना घडल्या. त्याने टी-20 संघाचं नेतृत्व सोडलं. त्याचा हा निर्णय भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर घेऊन जाणारा असाच होता. त्याला जर कॅप्टन्सी सोडायचीच होती तर त्याने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ही गोष्ट सांगितली असती तरी चालले असते. स्पर्धेआधीच त्याने केलेली घोषणा ही देखील बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडखानी करण्याइतकीच वाईट होती.
त्याची शिक्षा त्याने वनडेतील कॅप्टन्सी गमावून भोगली. कॅप्टन्सीचा तोरा मिरवताना त्याने अनेक दिग्गजांशी पंगा घेतलाय. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं केलेली वक्तव्ये ही बाहेर जाणारा चेंडूसारखीच होती. गांगुलीच्या बोलंदाजीवर त्याने संयम दाखवला असता तर विराट आता जेवढ्या अडचणीत सापडलाय तेवढ्या अडचणीत नसता. तो चुकांची पुनरावृत्ती करत राहिला तर ती बीसीसीआयसाठी फ्री हिट ठरेल. आणि आज जस त्याला पॅव्हेलियनमध्ये परताव लागल तसं कसोटी कर्णधार पदही हातून निसटून जाईल. विराट भारी आहे...त्याच्या नेतृत्वाखाली आपली कामगिरीही चांगलीच झालीये. पण सर्व काही चांगल होतेय म्हणजे तुम्हाला मनमानी करण्याच लायसन्स मिळालंय असं होत नाही. ही गोष्ट विराटने ध्यानात ठेवायला हवी.
विराट कोहली मशीन नसून माणूस असला तरी त्याच्या धावा करण्याच्या गतीमुळे त्याला रनमशीन म्हटलं जातं. पण दोनवर्षांपासून या रनमशिनला आउटपूट घटलाय. शतकाशिवाय त्याची बॅट गंजलीये की काय? असा प्रश्न क्रिकेट जाणकाराला पडला असला तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे आता विराटने अंतर्गत गोष्टी बाजूला ठेवून कोणता चेंडू खेळायचा आणि कोणता चेंडू सोडायचा हे ठरवायला हवं. जर त्याने ही गोष्ट मनावर घेतली तर त्याचे शतक ठरलेलच आहे. फक्त गरज आहे ती गोष्टी समजून घेण्याची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.