SAFF Championship : अतिशय उत्कंठावर्धक अशा सामन्यात भारताने पेनल्टी शूटाऊटमध्ये लेबनॉनचा ४-२ असा पराभव करून सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. येत्या ४ तारखेला भारताचा कुवेतविरुद्ध विजेतेपदाचा सामना होईल.
गेल्या महिन्यात झालेल्या आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत भारताने लेबनॉनवर विजय मिळवला होता; मात्र आज याच लेबनॉन संघाने भारतीयांचा कस पाहिला. अखंड डाव आणि जादा डावात गोल न झाल्याने पेनल्टी शूटआऊट झाला. त्यात मात्र भारताने सहज बाजी मारली.
भारताचा फुटबॉल सुपरस्टार सुनील छेत्रीकडून अखंड आणि जादा डावातही गोल करण्याच्या किमान तीन संधी वाया गेल्या; मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याने कोणतीही चूक केली नाही. त्याच्या गोलाने पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचे खाते उघडले.
भारताच्या आजच्या खेळात गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूचे योगदान फार मोठे ठरले. निर्धारित खेळात त्याने दोन ते तीन गोल अडवले. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन किक अडवल्या. भारताकडून या पेनल्टी शूटआऊटमध्ये छेत्री, अन्वर अली, महेश सिंग आणि उदांता यांनी गोल केले.
भारताला या महत्त्वाच्या सामन्यातही मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्याशिवाय खेळावे लागले, तरीही खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. उलट धैर्याने खेळ केला. रेड कार्डमुळे दोन सामन्यांची बंदी असल्यामुळे ते आज प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. सामना संपताच मैदानात येऊन सहायक प्रशिक्षक महेश गवळी यांना आलिंगन देत विजय साजरा केला.
या सामन्यात आमच्या क्षमतेचा फारच कस लागला; उद्या पूर्ण दिवस आम्ही विश्रांती घेणार आहोत. लेबनॉन हा संघ चांगला प्रतिकार करणार आहे. मुळात आम्ही अंतिम फेरीचा विचार करून खेळत नव्हतो. आजच्या सामन्यातच विजयाचा विचार करत होतो. आता आम्ही अंतिम सामन्याचा विचार करू, असे मत कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.
मुळात या सामन्याची सुरुवातच भारतावर दडपण येणारी होती. आठव्याच मिनिटाला गुरप्रीतला डोळ्यात तेल घालून गोलरक्षण करावे लागले. लेबनॉनच्या झिईन फरानने मारलेला चेंडू त्याने यशस्वीपणे अडवला. त्यानंतर अशी काही आक्रमणे त्याने यशस्वीपणे थोपवली.
एकीकडे गुरप्रीत अभेद्य गोलरक्षण करत असताना दुसरीकडे सुनील छेत्री गोल करण्याचे प्रयत्न करत होता, परंतु चेंडू काही गोलजाळ्याचा वेध घेत नव्हता. मुळात आजच्या सामन्यात सुरुवातीला भारतीय खेळाडूंमध्ये अनेक मोकळ्या जागा निर्माण होत होत्या. याचा फायदा घेत लेबनॉनचे आक्रमक आक्रमण करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.