ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात 4 मार्च 2022 हा दिवस अत्यंत वेदनादायी म्हणून नोंदवला जाणार आहे. आज ऑस्ट्रेलियन क्रिकेटने दोन दिग्गज गमावले. एक विकेटच्या मागे भींत म्हणून उभा राहणारा होता तर दुसरा विकेटवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा होता. आज दिग्गज विकेट किपर रोड मार्श आणि फिरकीचा जादूगार शेन वॉर्न (Shane Warne) यांच्या निधनाची बातमी कानावर आदळली. रोड मार्श हे तसे जुन्या पिढीतील 70, 80 च्या दशकातील होते. मात्र शेन वॉर्न अजून पन्नाशीतच होता. त्यामुळे शेन वॉर्नच्या अचानक निधनाच्या (Shane Warne Passed Away) बातमीने धक्का बसला.
शेन वॉर्नची ती खात्या पित्या घरातल्या गोल मटोल चेहरा असलेली प्रतिमा लगेच डोळ्यासमोर येते. मॅग्रा, ब्रेटली, गिलेस्पी या तगड्या देहयष्टीच्या कांगारूंच्या कळपातील हा सर्वसाधारण अंगकाठीचा तसा हेल्दी बॉय वेगळा उठून दिसायचा. हे वेगळेपण त्याने आपल्या कामगिरीतही दाखवले. ज्यावेळी शेन वॉर्नचा उदय झाला त्यावेळी ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड या सारख्या संघात फिरकीपटू (Spinner) म्हणजे एक कामचलाऊ साधन होते.
कांगारूंचा तोफखाना दमला की त्यांच्या खांद्यांना विश्रांती देण्यासाठी फिरकी गोलंदाजांचा खांदा वापरला जायचा. मात्र शेन वॉर्नने ही प्रथाच बदलली मॅग्राच्या स्विंग, ब्रेट लीचा वेग आणि गिलेस्पीचे कटर ऐन भरात असताना देखील शेन वॉर्नने आपल्या हातभर वळणाऱ्या लेग स्पिनने (Great Leg Spinner) संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. या दिग्गज वेगवान गोलंदाजांच्या गर्दीतही शेन वॉर्नने विकेट्सचा रतीब लावला.
शेन वॉर्नच्या काळातील दुसरा दिग्गज फिरकीपटू म्हणजे मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan). मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यात कायम जगातील सर्वश्रेष्ठ फिरकीपटू कोण यासाठी चुरस असायची. मुरली अॅक्शन कायम वादात राहिली. तसेच त्याला मायदेशातील तसेच आशिया खंडातील फिरकी खेळपट्ट्यांची साथ लाभली. त्यामुळे तो विकेट्सच्या स्पर्धेत शेन वॉर्नला मागे टाकणे सहाजिकच होते. तसेही मुरली लंकेचा हुकमी एक्का होता. त्यामुळे कसोटीत गोलंदाजीचा त्याचा एक एंड फिक्स असायचा. दुसरीकडे शेन वॉर्नच्या षटकात आणि विकेट्समध्येही तीन तीन वाटेकरी. दिवसाच्या 90 षटकांमध्ये त्याच्या वाट्याला तशी कमीच षटके येत होती. शेन वॉर्न आणि मुरलीने टाकलेल्या चेंडूवरून तुम्हाला याची कल्पना येईलच. वॉर्नने कसोटी, वनडे मिळून 51 हजार 347 चेंडू टाकले त्यात 1001 विकेट मिळवल्या. त्या उलट मुरलीने वनडे, कसोटी आणि टी 20 मिळून 63 हजार 132 चेंडू टाकून 1347 विकेट घेतल्या. मुरलीने वॉर्नपेक्षा 11 हजार 785 चेंडू जास्त टाकले. म्हणजे 1 हजार 964.1 षटके जास्त टाकण्याची संधी मुरलीला मिळाली.
अशी परिस्थितीतही शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1001 विकेट घेतल्या. मुथय्या मुरलीधरनने 1347 आंतरराष्ट्रीय विकेट घेणे हे फारसे आश्चर्यकारक नाही. कारण तो फिरकीच्या माहेरघरातच जन्मला आणि मोठा झाला. मात्र शेन वॉर्नने आपल्या प्रतिभेने वेगवान गोलंदाजांच्या भाऊगर्दीत आपला ठसा उमटवला. त्याची कामगिरी फक्त दखलपात्र नव्हती तर त्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासावर अधिराज्य गाजवले. त्यामुळेच शेन वॉर्न आजही अनेकांचा आवडता फिरकीपटू आणि व्यक्ती आहे. असा फिरकीचा बादशाह अवघ्या 52 व्या वर्षी असा अचानक जाणे हे मनाला चटका लावून जाणारे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.