श्रीदीप गावडे याचे ‘मुंबई श्री’ झाल्यानंतर एक-दीड वर्षातच मूत्रपिंड प्रत्यारोपण करावे लागेल, ही बातमी पसरताच मला अनेकांचे फोन आले. माझे स्वतःचे जिम आहे, त्यामुळे पालकांनी ‘मुंबई श्री’ विजेत्यास अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो, मग आमच्या मुलांनाही होऊ शकतो का, अशी विचारणा केली. आता त्याच्याबाबत नेमके काय घडले, कशामुळे घडले याबाबत मी कोणतीही टिप्पणी करणे अयोग्य होईल. त्याला हा आजार होण्याचे नेमके कारण काय, हे सांगणे अवघड आहे. त्याच्या मित्रांबरोबर मी चर्चा केली आहे. त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. त्याबाबत काहीही बोलणे अयोग्य होईल; मात्र सप्लिमेंटस्च्याच वापरामुळेच हे झाले, हा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल.
हे पण वाचा -शेतकऱ्यांनो वेळीच जागे व्हा नाहीतर...
मी एक साधे उदाहरण देतो. आपण जेव्हा आजारी पडतो किंवा अशक्तपणा येतो, त्यावेळी डॉक्टर आपल्याला प्रोटीन्स घेण्याचा सल्ला देतात. हेही एक प्रकारे सप्लिमेंटच झाले. ते किती घ्यावे हे आपल्याला डॉक्टर सांगतात, त्यानुसार आपण घेत असतो, त्याचे प्रमाण वाढवले तर काय होईल, जे होईल, त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे लागतातच. प्रोटीन्स सप्लिमेंटस घेतल्यावर त्रास झाला असे म्हणाल, पण समजा जेवण जास्त झाले तर काय होते, आपल्याला त्रास होतोच. त्याचवेळी काही झटपट करायला सांगितले तर ते होत नाही. काहीसे हेच व्यायाम वा शरीरसौष्ठव करणाऱ्या स्पर्धकांसाठी सप्लिमेंटसचे आहे. शरीरसौष्ठव करणारेच कशाला जिममध्ये रोज येतात, त्यातील अनेकांसाठी प्रोटीन्सची गरज असू शकते. हो, गरज असू शकते. आपल्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे, हे महत्त्वाचे आहे.
हे पण वाचा - भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विसावला गोठ्यात अन्...
अंड्यातही प्रथिने आणि फॅट्स
शरीरसौष्ठवासाठी प्रोटीन्स आवश्यक असतात. ती पनीर, चिकन, अंडी यातून मिळत असतात. अंड्यातील प्रथिने ही पांढऱ्या भागात असतात, तसेच पिवळ्या भागात फॅट्सचेही प्रमाण असते. आता त्यातील प्रमाण पाहिले आणि शरीरसौष्ठव करणाऱ्या स्पर्धकांना असलेली प्रोटीन्सची गरज बघितली तर दोन डझन अंडी खाणे भाग पडेल, ही कितपत पचनी पडतील याचा आपण विचार करायला हवा. पूर्वी गावठी अंडी, गावठी चिकन मिळत असे, ते शरीरसौष्ठवासाठी उपयुक्त असे. आता हे सर्व शुद्ध आढळते का, कोणीही याचे उत्तर नाही असेच देईल, आपण नेहमी जे अन्नपदार्थ खात असतो, त्यातून शरीराला पोषक असणारी मूल्ये मिळत नसतील तर त्यासाठी सप्लिमेंटसची गरज असते. मला वाटते या सप्लिमेंटस् शब्दाबद्दल अनेकांना तिटकारा आहे. हुशार आणि अभ्यासू मुलांना जसे परीक्षेत उत्तरपत्रिका सोडवताना सप्लिमेंटस् लागतात, तसेच हे आहे.
उत्तेजक आणि सप्लिमेंटस्
साध्या सोप्या शब्दांत उत्तेजक (स्टेरॉईडस) आणि सप्लिमेंटस यात खूप फरक आहे. पण... यातील हा फरकच महत्त्वाचा आहे. आता ही सप्लिमेंटस् म्हणजे स्टेरॉईड्स नव्हे. सोप्या शब्दांत सांगायचे तर बंदी घातलेले उत्तेजक नव्हे. ग्लुकोज हेही एक प्रकारचे शरीराला उत्तेजना देणारे आहे. सामन्यादरम्यान अनेकांना आपण केळे खाताना बघतो, किंबहुना त्यांना त्यावेळी एनर्जी देणारे ते एक प्रकारचे सप्लिमेंटस् असते, त्यामुळे सप्लिमेंटसची विश्वासार्हता तपासून घेण्यात काही गैर नाही. पण उत्तेजकांपासून सर्वांनी दूरच राहिले पाहिजे, नाहीतर त्याचे दुष्परिणाम होणारच!
वैद्यकीय चाचणी हवीच
सप्लिमेंटस् कोणती घ्यायची, किती प्रमाणात घ्यायची, कधी घ्यायची, कशी घ्यायची याचे पूर्ण ज्ञान आपल्याला असते का? आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात त्याचे प्रमाण कमी-जास्त करायचे असते. त्याचा वापर करण्यापूर्वी आपल्या शरीराला कोणती सप्लिमेंटस् साथ देतील, कोणती प्रतिकूल ठरतील, याची तपासणी होण्याची गरज आहे. आपण अनेकांना नियमित खाद्यपदार्थांची ॲलर्जी असल्याचे बघतो, मग ही सप्लिमेंटस् घेण्यापूर्वी मेडिकल टेस्ट करायलाच हवी व ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावी. काही सप्लिमेंटस्चा आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यासाठी डॉक्टर, डाएटीशनचा सल्ला महत्त्वाचा असतो, मात्र अनेक जण हे टाळतात. तो आमच्या जिमला येतो, तो ही सप्लिमेंटस् घेतो, तीच मी घेणार, असा हट्ट धरला जातो. ते चुकीचे आहे.
सप्लिमेंटस्ची व्याप्ती खूपच मोठी आहे, त्यापेक्षाही बाजारात असलेली उत्पादनेही जास्त आहेत. त्यातील नेमकी फायदेशीर कोणती, कशात भेसळ आहे, कशाचा आपल्याला उपयोग होईल, हेही बघायला हवे. गेल्या काही वर्षांत याचे उत्पादन वाढल्याचे आपल्याला दिसेल. आपण घेणार असलेल्या सप्लिमेंटस्ची न्यूट्रीशनल व्हॅल्यू किती आहे. त्यात प्रोटीन्स तसेच आपल्याला हवे असलेले पोषक घटक किती आहेत, हे बघायला हवे. आज बाजारात दोनशेपासून पाच हजारापर्यंत सप्लिमेंटस् आहेत. त्यात नक्कीच स्पर्धा आहे. या स्पर्धेचे दुष्परिणाम जे होणार ते होतात. आता याची नियमित तपासणी यंत्रणांमार्फत होण्याची महत्त्वाची गरज आहे.
स्पर्धेपूर्वी मार्गदर्शनाचा विचार
शरीरसौष्ठव संघटना यापूर्वीच विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्यावेळी उत्तेजकांबाबत मार्गदर्शन करते, त्याचप्रकारे सप्लिमेंटस्बाबतही मार्गदर्शन होत असते. त्यातील धोके सांगितले जातात. आता श्रीदीप गावडे याच्याबाबत जे काही घडले त्याबाबत आम्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सातत्याने चर्चा होत आहे. त्यातून स्पर्धकांना मार्गदर्शनाचा विचार समोर आला आहे. प्रत्येक स्पर्धेच्या वेळी वजने झाल्यावर प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हे मार्गदर्शन करता येऊ शकेल. एका दुर्घटनेमुळे खेळाबाबतचे गैरसमज दूर करण्याची ही आम्हालाही एक संधी आहे. अर्थात स्पर्धकांनी, नवोदितांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रामुख्याने सर्व खेळाडूंनी उत्तेजक द्रव्यांपासून लांबच राहिले पाहिजे. त्यापासून होणाऱ्या परिणामांची माहिती करून घेतली पािहजे. त्याबाबत सर्वांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. खेळाबरोबरच खेळाडूंची प्रगती होण्यासाठी, त्यांच्या सुदृढ राहणीमानासाठी हे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.