Suryakumar Yadav Ranji Trophy 2022 : भारतातील स्थानिक क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघासमोर आजपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडकातील एलिट ब गटातील लढतीत हैदराबादचे आव्हान असणार आहे. या गटामध्ये पहिल्या फेरीच्या लढतींमध्ये मुंबईसह महाराष्ट्र या संघानेच प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक विजय मिळवून सहा गुणांची कमाई केली. तमिळनाडू व सौराष्ट्र या संघांनी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. आसाम व हैदराबाद संघाला प्रत्येकी एका गुणावरच समाधान मानावे लागले आहे. मुंबईच्या संघात उद्याच्या लढतीत सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होणार आहे. यामुळे मुंबई संघाची ताकद आणखी वाढणार आहे.
मुंबईने सलामीच्या लढतीत आंध्र संघावर दणदणीत विजय मिळवत प्रतिष्ठेच्या स्पर्धेची शानदार सुरुवात केली, पण पहिल्या लढतीत मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अरमान जाफर (११६ धावा) व तनुष कोटियन (६३ धावा) यांचा अपवाद वगळता फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. अजिंक्य रहाणे (४४ धावा), यशस्वी जैसवाल (४५ धावा) यांनी थोडीफार झुंज दिली, पण भारताच्या संघातून डावलण्यात आलेल्या रहाणेला स्थानिक क्रिकेटमध्येही सूर गवसलेला नाही. हा त्याच्यासाठी चिंतेचा विषय असणार आहे. याशिवाय पृथ्वी शॉ, सर्फराझ खान या दोन खेळाडूंसाठीही हा मोसम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या स्पर्धेद्वारे त्यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे होऊ शकणार आहेत.
कसोटीत खेळायचेय
सूर्यकुमार यादवने भारतासाठी १५ एकदिवसीय व ४२ टी-२० सामने खेळले आहेत; मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. रणजी लढतीच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमारने मनोगत व्यक्त करताना म्हटले, की क्रिकेटची सुरुवात विविध वयोगटांतील क्रिकेटने होते. त्यानंतर मुंबईसाठी रणजी स्पर्धा खेळायला मिळते. त्यामुळे लाल चेंडूच्या क्रिकेटचा अनुभव मोठा आहे. सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये कालांतराने स्थिरावलो; मात्र भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. लाल चेंडूने खेळले जाणारे क्रिकेट माझ्या हदयाच्या जवळ आहे, असेही सूर्यकुमार आवर्जून म्हणाला.
महाराष्ट्राचे लक्ष्य सलग दुसऱ्या विजयाचे
मुंबईसह महाराष्ट्र संघाने एलिट ब गटामध्ये दमदार विजयी सलामी दिली. ऋतुराज गायकवाड व अंकित बावणे यांच्याविना खेळणाऱ्या महाराष्ट्राने बलाढ्य दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला आणि ६ महत्त्वाच्या गुणांची कमाई केली. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या लढतीत त्यांना सौराष्ट्राशी दोन हात करावयाचे आहेत. याप्रसंगी महाराष्ट्राचा संघ सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला असेल. याआधी सौराष्ट्र व आसाम यांच्यामधील लढत अनिर्णित राहिली होती; मात्र सौराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेत तीन गुणांची कमाई केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.