तारौबा : वेस्ट इंडीजने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव करून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अव्वल आठ संघांच्या फेरीत स्थान मिळवले; तर सलग दुसऱ्या पराभवामुळे न्यूझीलंडचे आव्हान संपल्यातच जमा झाले.
शेरफेन रुदरफोर्डच्या नाबाद ६८ धावा वेस्ट इंडीजसाठी मौल्यवान ठरल्या. प्रथम फलंदाजीत त्यांनी ९ बाद १४९ अशी मजल मारली. १७.५ षटकांत त्यांची ९ बाद ११२ अशी अवस्था झाली होती. अखेरच्या १३ चेंडूंत त्यांनी ३७ धावा कुटल्या. न्यूझीलंडला २० षटकांत ९ बाद १३६ धावा करता आल्या. त्यांनी हा सामना १२ धावांनी गमावला.
ट्रेंट बोल्ड आणि टीम साऊदी यांच्या वेगवान माऱ्यासमोर वेस्ट इंडीजचा डाव ६ बाद ५८ अशा संकटात सापडला होता. शेरफेन रुदरफोर्ड एक बाजू खंबीरपणे लढवत होता. त्याने ३९ चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी केली. अखेरच्या दोन षटकांतील त्याची आक्रमक फलंदाजी वेस्ट इंडीज संघासाठी तारणहार ठरली.
पहिल्या साखळी सामन्यात बांगलादेशविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भ्रमनिरास केला होता. आजचा सामनाही त्यास अपवाद नव्हता. अनुभवी आणि कर्णधार केन विल्यम्सन,
डेव्हन कॉन्वे, राचिन रवींद्र, डॅरेल मिचेल असे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे न्यूझीलंडची ५ बाद ६३ अशी अवस्था झाली होती. त्यातून मार्ग निघणे कठीण होते. तरी ग्लेन फिलिप्सने ४० धावा फटकावत प्रयत्न कायम ठेवले, पण अलझारी जोसेफ आणि गुदाकेश मोती यांच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडची डाळ शिजली नाही.
वेस्ट इंडीजने तिन्ही सामने जिंकून ६ गुणांसह अव्वल आठ संघांच्या फेरीत स्थान निश्चित केले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानचे २ सामन्यांतून ४ गुण झाले आहेत, तर न्यूझीलंडने दोन्ही सामने गमावल्यामुळे त्यांच्या नावावर एकही गुण नाही.
त्यांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि अफगाणिस्तानचा अखेरच्या दोन्ही सामन्यात पराभव झाला, तर दोघांचे प्रत्येकी चार गुण होतील; परंतु आता अफगाणिस्तानची निव्वल सरासरी + ५.२२५ अशी सक्षम आहे, तर न्यूझीलंडची सरासरी - २.४२५ अशी आहे. त्यामुळे न्यूझीलंडला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
वेस्ट इंडीज ः २० षटकांत ९ बाद १४९ (निकोलस पूरन १७ - १२ चेंडू, ३ चौकार, शेरफेन रुदरफोर्ड ६८ - ३९ चेंडू, २ चौकार, ६ षटकार, अकील हुसेन १५, आंद्रे रसेल १४ - ७ चेंडू, २ चौकार, १ षटकार, रोमारिओ शेफर्ड १३, ट्रेंट बोल्ट ४-१-१६-३, टीम साऊदी ४-०-२१-२, लॉकी फर्ग्युसन ४-०-२७-२,
जिमी निशाम ४-०-२७-१) वि. वि. न्यूझीलंड ः २० षटकांत ९ बाद १३६ (फिन अलेन २६, ग्लेन फिलिप्स ४० - ३३ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, मिचेल सँटनर नाबाद २१ - १२ चेंडू, ३ षटकार, अलझारी जोसेफ ४-०-१९-४, गुदाकेश मोती ४-०-२५-३).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.