Ind Vs Pak: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. आयपीएलची सांगता होताच वर्ल्ड कपची रणधुमाळी रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत-पाक संघ एकाच गटात असून 24 आक्टोबरला दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात पहिला सामना खेळत स्पर्धेचा शुभारंभ करणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मालिका खंडीत झाल्यापासून हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत समोरासमोर येतात. टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने दुबईच्या मैदानात पुन्हा या दोन संघात तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेट जगताच्या नजरा या लढतीवर खिळल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी युएईला रवाना झालीये. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम याने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन टी-20 वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचे फोटो शेअर केले आहेत. यावर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसते. भारता विरुद्धच्या सामन्यात जिंकून या! नाहीतर मायदेशी परत येऊ देणार नाही, अशा धमक्या चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान संघाला देत आहेत.
पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने ट्विटरुन पोस्ट शेअर करताना क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास संदेशही दिलाय. त्याने लिहिलंय की, तुमची साथ आमच्यासाठी खास आणि महत्वपूर्ण बाब आहे. आमच्यासोबत रहा, आम्हाला प्रोत्साहन द्या, आमच्यासाठी प्रार्थना करा आणि आमच्यावर विश्वास ठेवा, असे बाबार आझमने आपल्या क्रिकेट चाहत्यांना म्हटले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळणार आहे. बाबरने केलेल्या ट्विटवर चाहते पाकिस्तानच्या संघाला शुभेच्छा देत आहेत. याशिवाय भारताविरुद्धच्या सामन्यासाठी सल्लाही देत आहेत.
एका नेटकऱ्याने म्हटलंय की, 24 आक्टोबरला भारताविरुद्धचा सामना जिंका नाहीतर तुम्हाला पुन्हा मायदेशी येऊ देणार नाही. काही लोक बाबर आझमच्या नेतृत्वाखाली यावेळी पाकिस्तानचा संघ भारता विरुद्धचा सामना जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. भारतीय चाहत्यांकडूनही प्रतिक्रियांची बरसात होत असून धोनी आणि कोहली सोबत असून यावेळीही टीम इंडियाच बाजी मारेल, असे प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
काही नेटकऱ्यांनी तरी या ट्विटवर 'मौका-मौका' ही जाहिरात शेअर करुन पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. या जाहिरातीच्या माधम्यातून वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे पाकिस्तान विरुद्धच्या रेकॉर्डची आठवण पाकिस्तानी चाहत्यांना करुन देण्यात येत आहे. टी-20 आणि 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकदाही भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. हा विक्रम अबाधित राहिल, असे भारतीय चाहत्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.