T20 World Cup IND vs PAK : न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा दुसरा सराव सामना पावसाने वाया गेला. ब्रिस्बेनला असा काही जोरदार पाऊस झाला की पुण्याच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळाची आठवण झाली. भारतीय संघातील काही खेळाडूंनी इनडोअर सराव सुविधेचा वापर करून दुधाची तहान ताकावर भागवली, पण रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावरही पावसाचे सावट असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात मुख्य फलंदाजांनी हात साफ करून घेतले. गोलंदाजीत फिरकी गोलंदाजांना अंदाज आला. तसेच मोहंमद शमीला शेवटचे षटक देण्याची कल्पना खूप मोठा दिलासा देऊन गेली. दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला दीपक हुडाला संधी देऊन बघायचे होते. पाचव्या क्रमांकावर वेळ पडली, तर हुडाला खेळवण्याचा विचार अजून कायम आहे. हुडा गरज पडली तर ऑफ स्पीन टाकू शकतो, ही त्याच्याकरता जमेची बाजू आहे. अश्विनने आपले कसब दाखवून दिल्याने युझवेंद्र चहलवरचे दडपण वाढले आहे. संघ व्यवस्थापन चहलला प्राधान्य द्यायचे का अक्षर पटेलला, याचा अजून ऊहापोह करत आहे.
मैदानात कोणता निर्णय घेण्यात येतो हे पाहायला आवडेल.
भारतीय संघ गुरुवारी मेलबर्नला येणार असल्याने संयोजक कामाला लागले आहेत. एक लाख प्रेक्षक सामना बघायला मेलबर्न क्रिकेट मैदानावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ राहणार असलेल्या हॉटेलातील आणि आजूबाजूची सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ला निनाचा परिणाम
दुसऱ्या बाजूला 'ला निना' प्रकार मेलबर्नलाच नव्हे तर ऑस्ट्रेलियातील इतर शहरांनाही त्रास देत आहे. शनिवारी न्यझीलंड संघाचा पहिला सामना सिडनीला होणार असताना तिथेही ८० टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच नामिबियाचा पात्रता फेरीचा सामना पावसाने रद्द झाला, तर त्याचा खूप मोठा फटका श्रीलंकेला बसायची शक्यता आहे. टी-२० विश्वकरंडकातील लढतींवर पावसाचे सावट असल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींची निराशा होऊ शकते.
ऑस्ट्रेलियातही उन्हाळ्यात पाऊस
ब्रिस्बेनच्या सामन्याला पावसाने 'खो' घातल्यावर बऱ्याच क्रिकेटप्रेमींना रविवारच्या सामन्याची चिंता लागली आहे. मंगळवार बुधवारी मेलबर्नला कडक ऊन पडले असताना रविवारची हवामानाची भविष्यवाणी तितकी चांगली नाही. सिडनीहून क्रिकेटप्रेमी आठ तास गाडी चालवून मेलबर्नला येण्याच्या तयारीत असताना पावसाने व्यत्यय आणू नये अशीच सर्वांची मनोमन प्रार्थना पर्जन्यराजाला आहे. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियात हिवाळा संपून उन्हाळा चालू होऊनही अजून पाऊस हजेरी लावून त्रास देत असल्याने स्थानिक लोकसुद्धा नाराज झाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.