England vs India Test matches 2024 Brendon McCullum : ‘बाझबॉल’ (सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी) या मानसिकतेने कसोटी सामन्यातील आमचा पवित्रा बदलला आहे. भारताविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेत निकाल काहीही लागला तरी आम्ही आमचा हा पवित्रा बदलणार नाही, असे ठाम मत इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम यांनी व्यक्त केले.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जानेवारीत भारतात येत आहे. ॲशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंड संघासाठी फार मोठे आव्हान भारतात खेळताना असणार आहे. फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्यांची पुन्हा एकदा अग्निपरीक्षा होणार आहे.
मुळचे न्यूझीलंडचे आक्रमक फलंदाज असलेले ब्रँडन मॅकलम हे आता कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रशिक्षक आहेत. त्यांना ‘बाझ'' या टोपणनावानेही ओळखले जाते आणि त्यांच्या आक्रमक तत्त्वज्ञानाचे मूळ ‘कॉलिन्स डिक्शनरीत’ सापडते. त्यांनी इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून इंग्लंडचे फलंदाज परिस्थिती कशीही असो अति आक्रमक पवित्र्यानेच खेळ करून सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात.
कसोटी क्रिकेटमध्ये भारत बलवान संघ आहे आणि मायदेशात तर त्यांना हरवणे फारच कठीण असते, या संघाबरोबर आम्हाला पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे, असे मॅकलम म्हणाले. ते आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
या मालिकेची मलाही फार उत्सुकता आहे, कारण एका सर्वोत्तम संघाविरुद्ध आमची अग्नपरीक्षा होणार आहे. कारण मायदेशात भारतीय संघाची ताकद अधिक वाढलेली असते. यात यश मिळाले तर फारच उत्तम असेल आणि पराभूत झालो तरी सन्मानाने आम्ही लढा देऊ, असे त्यांनी सांगितले; परंतु काहीही झाले तरी आक्रमक पवित्रा कायम ठेवणार याचेही संकेत दिले.
कसोटी क्रिकेटवर आमचे अधिक प्रेम आहे आणि या प्रकारात सर्वोत्तम राहाण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकारात आक्रमक प्रवृत्तीने खेळण्याचा आमचा मानस असतो. जोपर्यंत आपण मैदानावर असतो तोपर्यंत आनंद घ्यायचा असतो. इंग्लंड संघात एकापाठोपाठ एक चांगले खेळाडू तयार होत आहेत, ही जमेची बाजू आहे. तसेच त्यामुळे नव्या खेळाडूंच्याही क्षमतेचा कस लागत आहे, असे मॅकलम यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.