Thomas Cup 2024: भारताच्या महिला संघानंतर आता पुरुष संघानेही चेंगडू, चीन येथे चालू असलेल्या थॉमस बॅडमिंटन करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या पुरुष संघाने ‘क’ गटातील साखळी फेरीच्या लढतीत इंग्लंडचा ५-० असा धुव्वा उडवला आणि आगेकूच केली. या गटामधून इंडोनेशिया व भारत यांनी प्रत्येकी दोन विजयांसह बाद फेरीत धडक मारली.
भारताच्या पुरुष संघाने सलामीच्या लढतीत थायलंडवर ४-१ अशी मात केली. शानदार फॉर्म त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या लढतीतही कायम ठेवला. एकेरीच्या सलामीच्या लढतीत एच. एस. प्रणोय याने हॅरी ह्युअँग याच्यावर २१-१५, २१-१५ असा ४२ मिनिटांमध्ये विजय मिळवला. भारतीय संघाला या विजयामुळे १-० अशी आघाडी मिळवता आली.
सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या स्टार जोडीला बेन लेन-सीन वेंडी या जोडीचे आव्हान परतवून लावण्यासाठी संघर्ष करावा लागला. सात्विक-चिराग जोडीने प्रतिस्पर्ध्यांचा संघर्ष २१-१७, १९-२१, २१-१५ असा तीन गेममध्ये एक तास व पाच मिनिटांत मोडून काढला.
किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या लढतीत नदीम दळवीवर २१-१६, २१-११ अशी मात केली. या विजयामुळे भारताचा इंग्लंडवरील विजय निश्चित झाला.
पहिल्या तीन लढती जिंकल्यानंतरही भारतीय बॅडमिंटन खेळाडूंनी वर्चस्व कमी होऊ दिले नाही. एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला या जोडीने रोरी इस्टोन-ॲलेक्स ग्रीन या जोडीवर २१-१७, २१-१९ असा सहज विजय नोंदवला. भारतीय जोडीने ३५ मिनिटांमध्ये बाजी मारली.
अखेरच्या एकेरीच्या लढतीत किरण जॉर्ज यानेही यश मिळवले. चोलन कयान याच्यावर विजय मिळवताना किरण याने २१-१८, २१-१२ असे वर्चस्व कायम ठेवले. किरण याने ४२ मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली.
‘क’ गटातील अखेरचा साखळी फेरीचा सामना भारत-इंडोनेशिया व थायलंड-इंग्लंड यांच्यामध्ये होणार आहे. थायलंड-इंग्लंड यांच्यामधील लढतीच्या निकालाने बाद फेरीवर काही फरक पडणार नाही. भारत-इंडोनेशिया यांच्यामधील लढतीतील विजेता या गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ ठरणार आहे. पराभूत संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.