Tokyo Olympics: टोक्योमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष भालाफेक (Men's Javelin Throw) प्रकारात भारताचा नीरज चोप्रा याने इतिहास रचला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत भालाफेक करताना नीरजने सर्वात लांब अंतर गाठलं. त्याने ८७ मीटरचं अंतर दोनदा पार केलं पण त्याचे प्रतिस्पर्धी ८६ मीटरचं अंतरदेखील पार करू शकले नाहीत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरजने भारतासाठी पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात शूटर अभिनव बिंद्रानंतर हे भारताचे केवळ दुसरे सुवर्णपदक ठरले. नीरजच्या विजयानंतर साऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच, त्याच्या बक्षीसांची बरसातही झाली. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, नीरजला भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च संस्था असलेल्या BCCIने आणि IPL मधील CSK ने कोट्यवधींची बक्षीसे आणि खास इनाम जाहीर केले.
BCCIचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून बक्षीसांची घोषणा केली. BCCIकडून सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यानंतर रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू आणि रविकुमार दहिया या दोघांना ५० लाखांचे इनाम घोषित करण्यात आले. तर कांस्यपदक विजेत्या पी व्ही सिंधू, लोवलिना बार्गोहाय आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. त्याशिवाय, सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या पुरूष हॉकी संघाला १.२५ कोटींचे बक्षीस देणार असल्याचीही घोषणा जय शाह यांनी BCCIच्या वतीने केली.
सुवर्णकमाई करणाऱ्या नीरज चोप्राला धोनीच्या CSK संघाकडूनही बक्षीस जाहीर करण्यात आले. "नीरज चोप्राने जिंकलेल्या सुवर्णपदकाबद्दल आम्हा साऱ्यांना त्याचा अभिमान आहे . त्याच्या सुवर्णमय कामगिरीमुळे युवा पिढी खेळाकडे करियर म्हणून पाहतील. आपापल्या आवडीच्या खेळात सर्वोत्तम कामगिरी करत देशाचे नाव उंचावण्याची ऊर्जा नीरजमुळे आजच्या तरूणाईला मिळाली आहे. नीरजच्या यशामुळे संपूर्ण भारताचं नाव जगात उंचावलं गेलं आहे. नीरजच्या या दमदार कामगिरीसाठी बक्षीस म्हणून आमच्याकडून १ कोटी रूपये त्याला देण्यात येतील", अशी घोषणा CSKचे प्रवक्ते यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.