UEFA Euro 2020 Portugal vs Germany : ग्रुप F मध्ये बाद फेरीतील आपले स्थान भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या गत विजेत्या पार्तुगालचा जर्मनीने अक्षरश: धुव्वा उडवलाय. पहिल्या हाफमधील 15 व्या मिनिटात रोनाल्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने 1-0 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर जर्मनीने पलटवार केला. 35 व्या मिनिटाला रुबेन दियास, 39 व्या मिनिटाला राफेल गुरेरो, 51 व्या मिनिटाला काय हेवार्टझ आणि 60 व्या मिनिटाला रॉबिन गोसेन्सने चौथा गोल डागून पोर्तुगालची हवाच काढली. अवघ्या 25 मिनिटात जर्मनीने चार गोल डागले.
जर्मनीच्या या धमाकेदार कामगिरीने 2014 च्या वर्ल्डकप आठवणीला उजाळा मिळाला. या वर्ल्डकपमध्ये पार्तुगालने जर्मनीचा 4-2 अशा धुव्वा उडवला होता. सहा वर्षानंतर जर्मनी पोर्तुगालचा बदला घेण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. युरो कप स्पर्धेत सर्वाधिक सहावेळा फायनल खेळणाऱ्या जर्मनीने तीन वेळा जेतेपद मिळवले आहे. मिनी वर्ल्ड कप समजली जाणारी ही स्पर्धा मागील हंगामात पोर्तुगालने जिंकली होती. स्पर्धेतील आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी पोर्तुगालने सुरुवातही चांगली केली. पण जर्मनीने पिछाडीवरुन मोठी आघाडी घेत हम किसी से कम नहीं चा ट्रेलर दाखवून दिलाय. 67 व्या मिनिटाला डिओगाने पोर्तुगालला दुसरा गोल मिळवून दिला. रोनाल्डोने मिळालेल्या पासवर त्याने आघाडी कमी केली. पण जर्मनीने 4-2 आघाडी शेवटपर्यंत कायम राखत पोर्तुगालला पराभूत केले. 2014 च्या वर्ल्ड कपमध्ये ज्या फरकाने पोर्तुगालने त्यांना नमवले होते. अगदी त्याची परतफेडच जर्मनीने केलीये.
ग्रुप F मध्ये फ्रान्सचा संघ अव्वलस्थानी आहे. त्यांनी दोन सामन्यातील एक सामना जिंकला असून एक सामना ड्रॉ केला आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण जमा आहेत. जर्मनीने स्पर्धेतील पहिल्या विजयासह 3 गुण मिळवत सर्वाधिक गोलच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर झेप घेतलीये. पोर्तुगाल 2 सामन्यातील एक विजय आणि एका पराभवासह 3 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून 2 सामन्यानंतर पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणारा हंगेरी तळाला आहे.