West Indies vs India Test Rahkeem Cornwall : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिजने कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात दोन अनकॅप्ड फलंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे, तर 'सर्वात वजनदार खेळाडू' फिरकीपटू रहकीम कॉर्नवॉलचे पुनरागमन झाले आहे. क्रेग ब्रॅथवेट कसोटीत विंडीज संघाची कमान सांभाळणार आहे.
रोहित शर्मा अँड कंपनी विरुद्ध मायदेशात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने अनेक आश्चर्यकारक नावे जाहीर केली आहेत. डॉमिनिका येथील कसोटीसह भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांची आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप मोहीम सुरू होईल.
वेस्ट इंडिजने युवा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स आणि अनुभवी अष्टपैलू काईल मेयर्सला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही नुकतेच दुखापतीतून सावरले आहेत. त्याचबरोबर सलामीवीर क्रेग ब्रॅथवेटकडे पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्कवर सुरू होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे.
कोण आहे रहकीम कॉर्नवॉल, दोन वर्षांनी मिळणार का संधी?
रहकीम कॉर्नवॉलला भारताविरुद्धच्या या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर जवळपास 2 वर्षानंतरचा हा त्याचा पहिला कसोटी सामना असेल. याआधी तो नोव्हेंबर 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत खेळला होता. 30 वर्षीय कॉर्नवॉल त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याने यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्यामुळे तो रोहितसोबतच टीम इंडियासाठीही धोका ठरू शकतो.
रहकीमच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 9 कसोटी सामन्यात 34 बळी घेतले आहेत. त्याच वेळी त्याने 238 धावा देखील केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 आहे. रहकीम कॉर्नवॉलचे वजन एकेकाळी 140 किलो इतके होते. तो जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
स्पिनर म्हणून पहिली पसंती असलेल्या गुडाकेश मोतीला दुखापत झाल्यामुळे कॉर्नवॉलची संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज जोमेल वॅरिकनचाही 13 खेळाडूंच्या संघात समावेश आहे. जोमेलने 13 कसोटीत 41 विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.