मेलबर्न : उपकर्णधार स्मृती मानधनाच्या आक्रमक अर्धशतकी खेळीनंतरही भारतीय महिला संघाला तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ट्वेन्टी-20 स्पर्धेचा हा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 धावांनी जिंकला.
येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या महिला ट्वेन्टी-20 स्पर्धेच्या सरावासाठी ही तिरंगी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुहेरी लीग असे स्वरूप असलेल्या या स्पर्धेत भारताने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता, परंतु आजच्या निर्णायक सामन्यात माजी विजेत्यांचा अडथळा पार करता आला नाही.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 6 बाद 155 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर बेथ मुनी हिने 54 चेंडूंत 71 धावांची खेळी केली. भारताचा डाव 20 व्या षटकांत 144 धावांवर संपुष्टात आला. अनुभवी डावखुरी फिरकी गोलंदाज जोनासेनने अवघ्या 12 धावांत भारताचा निम्मा संघ गारद केला.
भारताकडून स्मृती मानधनाचा अपवाद वगळता भरवशाच्या फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतर विकेट गमावल्या. त्यानंतर तळाच्या सर्व फलंदाजांनी नुसतीच हजेरी लावली. 156 धावांच्या आव्हानासमोर 15 व्या षटकांत भारताने 3 बाद 115 धावा केल्या होत्या.
पुढच्या 30 चेंडूंत 41 धावांची गरज होती, परंतु स्मृती मानधना 37 चेंडूंत 12 चौकारांसह 66 धावांची खेळी करून बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. त्या अगोदर शेफाली वर्मा आणि रिचा घोष जम बसत असतानाच बाद झाल्या होत्या. भरवशाची हरमनप्रीत कौरही 14 धावा करून बाद झाली.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : 20 षटकांत 6 बाद 155 (बेथ मुनी 71 -54 चेंडू, 9 चौकार, ऍशल्गेघ गार्डनर 26 -24 चेंडू, 5 चौकार, मेघ लेनिंग 26 -19 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, रॅशेल हेन्स 18 -7 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, दीप्ती शर्मा 30-2, राजेश्वरी गायकवाड 32-2) वि. वि. भारत : 20 षटकांत सर्वबाद 144 (शेफाली वर्मा 10 -9 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, स्मृती मानधना 66 -37 चेंडू, 12 चौकार, हरमनप्रीत कौर 14, दीप्ती शर्मा 10, तॅला व्लेमिक 32-2, जेस जोनासेन 12-5).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.