World Athletics Championships 2022 : ती ‘पॉकेट रॉकेट’ या टोपणनावाने ओळखली जायची; मात्र पाच वर्षांपूर्वी मुलगा झिऑनला जन्म दिल्यानंतर तिने २०१९ मध्ये दोहा येथे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटरची शर्यत जिंकली. त्यानंतर ती ‘मम्मी रॉकेट’ या नावाने ओळखली जाऊ लागली. याच ३५ वर्षीय ‘मम्मी रॉकेट’ म्हणजे जमैकाच्या शेली ॲन फ्रेझर प्रिसेने येथील हायवर्ड फिल्ड स्टेडियममध्ये १०० मीटरची शर्यत १०.६७ सेकंदाच्या स्पर्धाविक्रमासह जिंकून कारकिर्दीत पाचव्यांदा वेगवान धावपटूचा किताब मिळवला.
पुरुषांत अमेरिकेने; तर महिलांच्या १०० मीटर शर्यतीत जमैकाने तिन्ही पदके जिंकण्याचा पराक्रम केला. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी प्रथमच झाली. यापूर्वी जागतिक पातळीवर बीजिंग ऑलिंपिकमध्ये जमैकाच्या महिलांनी १०० मीटर शर्यतीत तीन पदके (रौप्यपदक दोघींना दिल्याने ब्राँझपदक नव्हते) जिंकण्याचा; तर टोकियो ऑलिंपिकमध्ये तिन्ही पदके जिंकण्याचा पराक्रम केला होता. शर्यत चुरशीची होईल याबाबत कुणालाच शंका नव्हती. कारण गेल्या वर्षाभरात शेली, रौप्यपदक विजेती शेरिका जॅक्सन (१०.७३ सेकंद) आणि ऑलिंपिकविजेती एलेन थॉम्पसन हेराह (१०.८१ सेकंद) यांनी गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांत एकमेकींवर विजय मिळवला होता. वर्षभरापूर्वी हायवर्ड फिल्ड येथेच एलेनने १०.६७ सेकंदात शर्यत जिंकली होती.
केवळ ५ फूट १ इंच उंची असलेल्या शेलीने थोडा संथ प्रारंभ केल्यानंतरही ४० मीटरनंतर वेग घेतला आणि त्यानंतर कुणाला जवळ येण्याची संधीच दिली नाही. शेरिका जॅक्सनने वैयक्तिक सर्वोत्तम वेळेची नोंद केली; तर रिओ व टोकियोत सुवर्णपदक जिंकणाऱ्या एलेन थॉम्पसनने प्रथमच जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत पदक जिंकले. अमेरिकन धावपटू अनुक्रमे सहाव्या व आठव्या स्थानावर आल्या. शेलीचे हे पाचवे विश्वविजेतेपद असून यापूर्वी एका इव्हेंटमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक वैयक्तिक पदके सर्गेई बुबका (पोल व्हॉल्ट), पावेल फादेक (हातोडाफेक) आणि लार्स रिडेल (थाळीफेक) यानांच मिळवता आली आहेत.
साबळे आज धावणार
मुरली श्रीशंकर लांब उडीत अपयशी ठरल्यानंतर नीरज चोप्रापूर्वी भारतीयांच्या अपेक्षा आता तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत मराठमोळ्या अविनाश साबळेवर आहेत. त्याची शर्यत स्पर्धा कार्यक्रमानुसार सोमवारी सायंकाळी ७.२० वाजता असली, तरी भारतीय वेळेनुसार ही शर्यत मंगळवारी सकाळी ७.५० होईल. त्यामुळे भारतीयांना उद्या ही शर्यत थेट पाहता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.