dwarkanath sanzgiri 
क्रीडा

World Cup 2019 : भारत-पाक तणाव मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा (द्वारकानाथ संझगिरी)

द्वारकानाथ संझगिरी

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय असतो.

भारत-पाकिस्तान हा विश्‍वचषकातला सामना, विश्‍वचषकाचा सर्वोत्कृष्ट "शोकेसपिस' असतो. कधी काळी असं स्वरुप इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्याला होतं. त्यांचं वैभव संपलं. गेली कित्येक वर्ष वैभवाचे दिवस आता भारत-पाकिस्तान सामन्याचे आहेत. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधली दुश्‍मनी ही त्यांच्या इतिहासात एक छोट वैर असेल, तरी एकाच "राणी'ची ही अपत्य आहेत. भारत-पाकिस्तानची राजकीय आणि राष्ट्रीय दुश्‍मनी आजही अश्‍वत्थामाप्रमाणे भळभळती जखम आहे. तुम्ही कधी इंग्लंडविरुद्ध जर्मनी असा फुटबॉलचा सामना पाहिलाय? प्रेक्षकांत बसून पहा. वातावरणाचं तापमान क्षणाक्षणाला वाढताना दिसेल. त्यांच्यातल्या दोन महायुद्धानंतर खरं तर जखमेवर कधीच खपली धरलीय. त्या दोन राष्ट्रांचे संबंध दोस्तीचे आहेत. पण फुटबॉलच्या मॅचच्या वेळी ती खपली निघणार की काय असं वाटायला लागलं. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत तर खपलीच धरलेली नाही. तिथे काय होणार?

खरंतर हा शोपिस, मागचा इतिहास, दोन्ही बाजूचे राजकारणी, मीडिया आणि माथी भडकलेली जनता ह्यांनी तयार केलाय. "एक अटीतटीचा सामना' म्हणून त्याकडे पहायची आपली तयारीच नाही. ह्या सामन्याला "एक प्रॉडक्‍ट' करून विकणाऱ्यांना हेच हवय. परवाच माझ्या ओळखीमधल्या कुणीतरी, खाणंपिणं, रहाणं सकट तीन हजार पौंडाचं तिकीट घेतलं. म्हणजे तीन लाख रुपये झाले ! फक्त मैदानावरची दुश्‍मनी आणि बाहेर वातावरण पाहायला! आफ्रिकन सफारीवर गेल्यावर, घरी उडतं झुरळ आणि पालीला घाबरणारी माणसं, "किल' पाहायला उत्सुक असतात. त्यांना कुणीतरी कुणाची केलेली शिकार पाहायची असते. ह्या सामन्याकडे पहाण्याची भारत किंवा पाकिस्तानी प्रेक्षकांची वृत्ती तशीच आहे. त्यामुळे हिंसेचा एक अंडरकरंट ज्या प्रेक्षकांत दिसतो तसा तो मैदानावरच्या खेळाडूत दिसतो. खेळाडूंवरही तो त्या सहा-सात तासांपुरता लादलेला असतो. मैदानाबाहेर भारत-पाकिस्तान खेळाडूत मी कधीही तणाव पाहिलेला नाही. आजच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंशी माझा फारसा संबंध नाही. पण पूर्वी जाणवायचं की दोन्ही संघातल्या खेळांडूत जी दोस्ती आहे ती त्यांची इतर संघाच्या खेळाडूंशी त्या प्रमाणात नाही. त्याचं मला आश्‍चर्य वाटत नाही. खाणंपिणं सारखं, सवयी सारख्या, आवडीनिवडी सारख्या.

मैदानाबाहेर स्फोटक वातावरण
1947 मध्ये एकसंघ भारताच्या नकाशावर एक रेष मारून, दोन देश झाले. म्हणून ते वेगळे ! मला आठवतंय 1999 मध्ये भारत-पाकिस्तान सामना मॅंचेस्टरला होता. मी, माझी बायको आणखीन काही पत्रकार आम्ही एका पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे आम्हाला चक्क सौरभ गांगुली भेटला. तो जेवायला आला होता. अनेक पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सनी त्याला गराडा घातला. त्याचं प्रेम ओसंडून वाहतंय असं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी मैदानावर तीच मंडळी प्रेक्षक बनून आली असावी. त्यांचा नूर बदलला होता. माझ्या बायकोसाठी मी अजित आगरकरकडून त्या मॅचचा पास घेतला होता. भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचचा पास किती महत्त्वाचा असतो हे मी सांगायची गरज नाही. ती मॅचला आली काही काळ बसली आणि निघून गेली. मी तिला संध्याकाळी हॉटेलवर विचारलं "काय झालं? एवढी इंटरेस्टींग मॅच अर्धवट सोडू कशी शकलीस? "मी एकटी होते आणि आजूबाजूला माहोल हिरवे झेंडे मिरवणाऱ्या पाकिस्तान्यांचा. भीती वाटली'. त्या दिवशी वातावरणात होता खरा दबाव. मॅच संपल्यावर आणि रिपोर्ट वगैरे संपल्यावर स्टेडियमच्या बगलेतल्या स्टेशनवर जातानाच वातावरण स्फोटक होतं. पेट घेण्यासाठी एका काडीची वाट पहात होती. ते इंग्लंड होतं. म्हणून काडी पेटवली गेली नाही.

सैनिकांचा अदृश्‍य वेश
प्रेक्षकांवर इतका दबाव असतो, तर खेळाडूंवर किती असेल? फक्त पाकिस्तानविरुद्ध खेळताना, आपण आपल्या खेळाडूकडे सैनिक म्हणून पाहतो. दीडशे वर्षे गुलामीत ठेवणाऱ्या इंग्रजांविरुद्ध खेळतानाही आपण आपल्या खेळाडूकडे त्या भावनेने पहात नाही. पाकिस्तानविरुद्ध खेळताना, खेळाडूंनाही सैनिक म्हणून खेळावं लागतं. पाकिस्तानी खेळाडूंची अवस्थाही तीच असते. 2003च्या दक्षिण आफ्रिकेतला भारत-पाकिस्तान सामना आठवतोय? त्याआधी इंग्लंडविरुद्ध खेळताना सचिनने कॅडिकच्या गोलंदाजीची कॅडबरी केली होती. कारण कॅडिकने सचिनबद्दल "तो फार कुणी नाही वगैरे बरळला' त्यानंतरची पुढची मॅच पाकिस्तानची, तरी वासिम अक्रम म्हणाला, "मला सर्वांत आनंद सचिनने कॅडिकला फोडून काढल्यावर झाला'. कॅडिकला एक जबरदस्त शिवी हासडून तो म्हणाला "जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाला हा सामान्य म्हणतो' त्या इंग्लंडच्या सामन्यात नेहराने स्विंगच्या पाळण्यात बालपण घालवलेल्या इंग्लिश फलंदाजांना स्विंगवर नाचवलं. नेहरा हा अक्रमचा पट्टशिष्य! अक्रम प्रचंड आनंदला होता. पण पाकिस्तानची मॅच झाली आणि सचिन, अक्रम, नेहरा सर्वांनी रंगीत कपड्यावर सैनिकाचा अदृश्‍य वेष चढवला. मला आठवतंय, त्या मॅचच्या आधी द्रविड प्रेस कॉन्फरन्सला आला आणि म्हणाला, "भारत-पाकिस्तान सामन्याकडे आम्ही आणखीन एक महत्त्वाचा सामना म्हणून पाहातो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, झिंबांब्वे तसा पाकिस्तान'. गांगुलीनेही मग री ओढत म्हटलं होतं, "आम्ही राजकारणाचा विचार करत नाही. करोडो मनं पेटतील असं वर्तन आम्ही करणार नाही' दोघांनीही पॉलिटिकली करेक्‍ट स्टेटमेंट केलं होतं. पण आतून दबाव, तर प्रत्येकाला जाणवत होता. हा आदर्शवाद झाला. खेळताना तो जाणवत नाही, हे दोघांनाही ठाऊक होतं. सेहवागच्या फलंदाजीकडे पाहिलं, तर मला वाटायचं की फलंदाज बाद होतो, आणि दबाव नावाची गोष्ट जगात आहे हे त्याला ठाऊक नसावं. पण ह्या भारत-पाकिस्तान मॅचच्या आधी नुसतं त्याचं मन जाणून सचिनने आपली नेहमीची जागा सोडून पहिला स्ट्राईक घेतला. 1999 च्या विश्‍वचषकातल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळीही सचिनने पहिला स्ट्राईक घेतला होता. कदाचित फार लहान वयात हे टेन्शन पचवायची सवय सचिनला लागल्याचा तो परिणाम असावा.

पहिल्यांदा आमनेसामने
1992 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा भारत पाकिस्तान संघ समोरासमोर आले. ते सिडनीचं मैदान माझ्या डोळ्यासमोर आहे. भारतीय संघाच्या, फक्त 217 धावा झाल्या होत्या. त्या वेळी 217 धावा "फक्त' वाटत नसतं. टी-20 नव्हतं आणि वनडे क्रिकेटची आक्रमकता अंगात नीट मुरलेली नव्हती. सचिनच्या 62 चेंडूतल्या नाबाद 54 धावा, आणि कपिलच्या 26 चेंडूतल्या झंझावती 35 धावांनी भारतीय संघाला तिथवर पोचवलं होतं. 19 वर्षाच्या सचिनने सैनिकाचा वेष आरामात अंगात घालून मिरवला होता. हा पाठलाग करताना एवढा दबाव पाकिस्तानवर आला की एरवी प्रेयसीप्रमाणे दबावाच्या कमरेत हात घालून फिरणाऱ्या जावेद मियॉंदादच्या डोक्‍यावरचा बर्फ वितळला. ती धग यष्टिरक्षक किरण मोरेच्या विखारी शब्दांनी पुरवली होती. पाकिस्तानच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाला यशस्वीपणे त्याने नामोहरम केल होतं. 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात "बेन्ससन ऍण्ड हेजेस' कप जिंकताना यष्टिरक्षक सदानंद विश्‍वनाथने तोच डाव वापरला होता. जावेदने मारलेल्या बेडूक उड्या आठवत असतील तुम्हाला. 180 धावांत पाकिस्तानी संघ कोसळला. 1986 मध्ये शारजात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून जावेदने पाकिस्तानला जिंकून दिलं होतं. तो पाठीवरचा वळ त्या दिवशी बुजला.

पाकमध्ये टीव्ही फुटले
1996 मध्ये बंगळूरला पुन्हा एकदा या दबावाने निर्माण केलेल्या ठिणग्या जाणवल्या. ते बंगळूर, ती मॅच कधीच विसरू शकत नाही. ज्वालामुखीसारखा, धुमसणाऱ्या स्टेडियमवर "दंगल' फक्त निमित्त शोधतंय असं वाटत होतं. त्यात ऐनवेळी कर्णधार वासीम अक्रमने माघार घेतली. तो फिट नाही, त्याने जाहीर केलं. अमीर सोहेल कर्णधार झाला. सिद्धूने 93 धावांची लढाऊ खेळी करून चांगल्या धावसंख्येचा पाया घातला आणि अजय जाडेजाने 25 चेंडूत 45 धावा ठोकून कळस चढवला. जाडेजाचा स्ट्राईकरेट त्या काळात "आवासणारा' होता. भारताने उभारलेल्या 287 धावा हा त्या काळाचा विचार केला तर कांचनजुंगा होतं. त्या विश्‍वचषकात फक्त श्रीलंका संघ एव्हरेस्ट उभारत होता. मॅच जिंकल्याची भावना प्रेक्षकांत होती आणि त्यानंतर सईद अन्वर, अमीर सोहेलने 10 षटकांत 84 धावा फटकावल्या. अचानक स्टेडियम थंड झाला. अन्वर बाद झाला. पण सोहेल लढत राहिला. वेंकटेश प्रसाद बंगळूरचा, पण स्टेडियमच्या एका कोपऱ्यातून त्याची निर्भत्सना केली जायला लागली. सोहेलला चेव चढला. त्याने प्रसादला एक घणाघाती फटका मारला आणि त्या दिशेला बॅट करून प्रसादला त्याने सुचवले "जा चेंडू घेऊन ये' तोपर्यंत शांत प्रसाद अंगार झाला होता. त्याने पुढचा चेंडू सोहेलच्या ऑफ स्टंपवर टाकला. सोहेलच्या डोक्‍यातली आधीच्या फटक्‍यांची नशा उतरली नव्हती. त्याने त्याच मूडमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि बोल्ड झाला. भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत असताना सोहेलला अहंकार नडला. प्रसादने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि जाताना चार इंग्रजी ओव्यांनी त्याला ओवाळले. मॅच फिरली. पाकिस्तान हरलं. पाकिस्तानात हाहाःकार माजला. एका बड्या फॅनने आधी टीव्ही फोडला, मग स्वतःला गोळी मारली. आमीर सोहेलचा पुतळा जाळला गेला. सोहेलची शब्दांनी चामडी सोलली गेली. क्रिकेटच्या जय-पराजयातून निर्माण होणारं हे हलाहल इतकं वाईट असतं. आपण हरलो असतो, तर आपल्याकडेही एव्हढीच तीव्र प्रतिक्रिया झाली असती. कारण भारत किंवा पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सची मानसिकता तीच आहे. त्यांच्यात एक एक कर्ण बाहेर येतो. त्याचं कौतुकाच औदार्य ओसंडून वहातं. पण हरल्यावर तो उठसूठ शाप देणारा दुर्वास होतो.

हा देशद्रोह कसा?
आपण काही बाबतीत दांभिक आहोत किंवा भावनेच्या लहरींवर चटकन स्वार होतो. पुलावामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळण्याच्या विचारांची मोठी लाट आली. जे लाटेवर स्वार व्हायला तयार नव्हते. ते देशद्रोही ठरवले गेले. सुनील गावसकर, सचिन तेंडूलकरने दोन गुणांचा हिशोब मांडला म्हणून नेटकऱ्यांनी त्यांना झोडपलं. अरे त्यांना काय देशप्रेम शिकवता ? त्यांनी अंगावर इम्रान सर्फराज, वासिम, शोएब घेतलेत. तुम्ही फक्त घोषणा दिल्या आहेत. लाट ओसरली, आता जोतो तिकीट शोधतोय. त्या वेळीही कुणी मिळालेली तिकीटं परत केली नव्हती. जगभरच्या भारतीयांकडे आता एवढा पैसा आहे की, बोरिवलीहून आपण चर्चगेटला ज्या सहजतेने जातो. त्या सहजतेने ते जगाच्या कुठल्याही टोकांकडून इंग्लंडला मॅच पहायला जातात. आणि आता भारताचा संघ, सातत्याने जिंकत असल्याने अशा मंडळीचा उत्साह वाढलाय. माझ्या मते प्रत्येक वेळी राष्ट्रप्रेमाची कसोटी. फक्त "क्रिकेटने' देणं हे चुकीचच. त्याच बरोबर पाकिस्तान मैदानावर हरल्यामुळे मिळणारा जो आनंद आहे, तो बहिष्कारात नाही.

ह्या वेळीसुद्धा भारत-पाकिस्तानी खेळाडू मैदानावर सैनिकाची अदृश्‍य गणवेश घालून खेळणार. त्यांना आपण पर्यायच ठेवलेला नाही. इतिहास आपल्या बाजूने आहे. गेल्यावर्षी पर्यंत. जागतिक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानने कधी हरवलं नव्हतं. गेल्या चॅंपियन ट्रॉफीत भारतीय संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरला. कागदावर पाकिस्तानी संघ भारताच्या तुलनेत बलशाली वाटत नाही. पण त्यांचे खेळाडू हे टाईल्सच्या छोट्या तुकड्यासारखे आहेत. एक दिवस असा येतो की ते तुकडे अचानक एकत्र येऊन विजयाचं सुंदर म्युरल तयार होतं. तो दिवस 16 जून हा नाही. ह्याबद्दल देवाला आपण साकडं घालूया. पण माझं एकच सांगणं आहे. आपण त्याना क्रिकेटच्या मैदानावरचे सैनिक करत असू आणि चुकून ते धारातिर्थी पडले, तर त्यांना सैनिकाची मानवंदना द्या. पुतळे जाळणे, वैगेरे हा कृतघ्नपणा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT