Aus vs Sa ODI : ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा एकदिवसीय विश्वकरंडक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मात्र भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातील सलामीच्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.
यामुळे आता आज होणाऱ्या दक्षिण आफ्रिकविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियन संघावर दबाव असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलामीच्या लढतीत श्रीलंकेवर दमदार विजय मिळवल्यामुळे लखनौ येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत ते आत्मविश्वासासह मैदानात उतरतील.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याला भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे विश्वकरंडकाच्या सलामीच्या लढतीलाही तो मुकला. पण आता तो तंदुरुस्त झाला असल्याचे कर्णधार पॅट कमिन्सकडून सांगण्यात आले. मात्र त्याला कोणत्या खेळाडूच्या जागी संघात घेतले जाईल, याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही. कॅमेरुन ग्रीन याच्याकडून चमकदार खेळ झालेला नाही. त्याच्याऐवजी मार्कस स्टॉयनिसला संधी दिली जाऊ शकते.
खेळाडू फॉर्ममध्ये...
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील बहुतांश खेळाडूंनी सलामीच्या लढतीत ठसा उमटवला आहे. क्विंटॉन डी कॉक, रासी वॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, डेव्हिड मिलर यांच्या बॅटमधून धावाच धावा निघाल्या आहेत. कर्णधार तेम्बा बावुमाकडून पहिल्या लढतीत छान खेळ झालेला नाही. गोलंदाजी विभागात मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा यांच्यावर मदार असेल. गेराल्ड कोटझे व तबरेझ शम्सी यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दृष्टिक्षेपात...
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्धच्या लढतीत विश्वकरंडकातील एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. आता २३ धावा केल्यानंतर त्याला ॲडम गिलख्रिस्टच्या विश्वकरंडकातील धावांना मागे टाकता येईल.
या वर्षातील दहा सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ॲडम झाम्पा याला एकही फलंदाज बाद करता आलेला नाही, तसेच विश्वकरंडकातील पाच लढतींमध्ये त्याला सातच्या सरासरीने पाचच फलंदाज बाद करता आले आहेत.
दक्षिण आफ्रिकन संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी मागील चार वर्षांमध्ये ४४.६च्या सरासरीने धावा फटकावल्या असून, ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी २९.९च्या सरासरीनेच धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.