Wrestler Protest WFI Election : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध भारताच्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली अन् त्यांच्या अटकेची मागणी केली होती. याचबरोबर आंदोलक कुस्तीपटूंनी बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची देखील मागणी केली. आता भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे बृजभूषण हे आपला अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जम्मू काश्मीरचे निवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता 6 जुलैला संघटनेतील सर्व पदांसाठी मतदान होणार असल्याची अधिसुचना प्रसिद्ध झाली आहे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील कुस्ती संघटनांना प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 19 जून आहे. यानंतर 22 जून पर्यंत या अर्जांची छाननी करण्यात येईल.
भारतीय कुस्ती महासंघाशी सल्लग्नित असलेली प्रत्येक राज्य कुस्ती परिषद दोन सदस्य पाठवू शकतात. प्रत्येक प्रतिनिधीचे एक मत असेल. यानुसार भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 50 मतं होतील. WFI ने यापूर्वी बडतर्फ केलेल्या राज्य कुस्ती परिषद देखील निवडणुकीत भाग घेण्यासाठी आपला दावा सादर करतील.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 जून पासून सुरू करण्यात येईल. 25 जून ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर अर्जांची छाननी 28 जून ला होणार आहे. उमेदवार 28 जून पासून 1 जुलैपर्यंत आपला अर्ज मागे घेऊ शकतात. यानंतर 2 जुलैला निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
या निवडणुकीत बृजभूषण कॅम्पची भुमिका काय असणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा सहकारी निवडणूक लढवू शकतात. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंना आश्वासन दिले आहे की बृजभूषण यांचा कोणताही नातेवाईक निवडणूक लढवणार नाही.
आता बृजभूषण यांच्या जवळच्या व्यक्ती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल. बृजभूषण यांचे पुत्र करण हे गेल्या WFI कार्यकारणीत उपाध्यक्ष होते. ते उत्तर प्रदेश कुस्ती परिषदेशी देखील जोडले गेले आहे. तर बृजभूषण यांचे जावई विशाल सिंह बिहार कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. ते दोघेही राज्याचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवण्यास पात्र आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.