ZIM vs SCO Sikandar Raza : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पात्रता फेरीतील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलँडचा 5 विकेट्स राखून पराभव करत सुपर 12 मध्ये प्रवेश केला. स्कॉटलँडचे 132 धावांचे आव्हान झिम्बाब्वेने 18.3 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. झिम्बाब्वेकडून कर्णधार क्रेग एरव्हिनने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर सिकंदर रझाने 23 चेंडूत आक्रमक 40 धावांची खेळी करत झिम्बाब्वेचा विजय निश्चित केला. स्कॉटलँडकडून जॉश डेव्हीने सर्वाधिक 2 बळी टिपले. तर जॉर्ज मुनसेने सर्वाधिक 54 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या स्कॉटलँडने पहिल्या दोन धक्क्यानंतर सावध सुरूवात केली. त्यांनी 10 व्या षटकात 64 धावांपर्यंत मजल मारली. मात्र तोपर्यंत स्कॉटलँडचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. सलामीवीर मुनसेने एक बाजू लावून धरत अर्धशतकी मजल मारली. त्याने संघाला शंभरच्या जवळ पोहचवले. तो 54 धावा करून बाद झाला.
मुनसे बाद झाल्यानंतर स्कॉटलँडच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मॅक्लॉयडने 25 धावांचे योगदान दिले. अखेर स्कॉटलँडने 20 षटकात 6 बाद 132 धावांपर्यंत मजल मराली. झिम्बाब्वेकडून चतारा, नगारवा यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. त्यांना सिकंदर रझा आणि मुझारबनीने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
स्कॉटलँडने विजयासाठी ठेवलेल्या 133 धावांच्या आव्हानाचा पाठलग करताना झिम्बाब्वेची सुरूवात खराब झाली. त्यांचे दोन फलंदाज अवघ्या 7 धावात माघारी परतले. मात्र त्यानंतर कर्णधार क्रेग एरव्हिनने डाव सावरण्यास सुरूवात केली. मात्र त्याचा जोडीदार सेन विलियम्स 7 धावांची भर घालून माघारी परतला.
आठव्या षटकात 3 बाद 42 धावा अशी अवस्था झालेल्या झिम्बाब्वेच्या मदतीला अनुभवी सिकंदर रझा धावून आला. त्याने कर्णधार एरव्हिनच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. सिकंदर रझाने 23 चेंडूत आक्रमक 40 धावांची खेळी केली. मात्र त्याला डॅव्हीने बाद करत झिम्बाब्वेला चौथा धक्का दिला. क्रेग एरव्हिनही संघाच्या 119 धावा झाल्या असताना बाद झाला.
अखेर मिल्टन शुम्बा (नाबाद 11) आणि रियान बुर्ल (नाबाद 9) यांनी 19 व्या षटकात झिम्बाब्वेचा विजय निश्चित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.