mansi kulkarni sakal
लाइफस्टाइल

आनंददायी कसरत

मानसी कुलकर्णी, अभिनेत्री

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा ‘छडा’ नावाचं नाटक सुरू होतं. हे नाटक मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि त्यासाठी मला नामांकनही मिळालं होतं. हे प्रायोगिक नाटक आविष्कार नाट्यसंस्थेतर्फे सादर केलं जात होतं. आईपणाची चाहूल लागल्यानंतर चौथ्या-पाचव्या महिन्यानंतर मी स्वतःहून थांबायचा निर्णय घेतला.

कारण एखादवेळी चित्रीकरण टाळू शकतो; पण नाटकाचा प्रयोग असेल तेव्हा खूपच कष्ट घ्यावे लागतात आणि अशा परिस्थितीत मला ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी स्वतःहूनच थांबण्याचा निर्णय घेतला. ही थोडीशी तडजोड करावी लागली, कारण मी आई होणार होते आणि जिथे माझी गरज जास्त होती, तिथेच वेळ देण्याचा निर्णय मी स्वतःहून घेतला होता.

आई झाल्यानंतर मी ठरवलं, की माझ्या बाळाला तितकाच वेळ द्यायचा आहे, जिथं त्याला माझी गरज आहे. त्याला जितकी माझी गरज होती, तितका वेळ मी त्याला दिला आणि त्यामुळे माझ्या करिअरमध्ये खूप मोठा गॅप पडला. अर्थात मला त्याचं वाईट वाटलं नाही, कारण आईपणाचा आनंद मी मनमोकळेपणाने घेतला. त्याचा फायदा बाळासह मलाही झाला.

आई झाल्यानंतर पहिलं वर्ष खूप वेगळं असतं आणि त्या वातावरणातून बाहेर येणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. सोपं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, की त्याला वेळ लागतो आणि मी तो वेळ माझ्या बाळाला दिला. मोठ्या गॅपनंतर पुन्हा करिअरला सुरुवात करताना ॲडजस्ट करायला थोडी अडचण आली. अभिनय आणि चित्रीकरणाच्या वेळांची सवय सुटली होती. अभिनयात अनेक संधी येत होत्या; पण मला काही गोष्टींना वेळ द्यायचा होता.

त्यामुळे मी लगेच काम स्वीकारलं नाही. माझी दिनचर्या ही माझ्या मुलीच्या अनुषंगानं बदलत होती. तिच्या झोपेच्या वेळीच मी झोपून घ्यायचं किंवा ती झोपली असेल तर जेवून घ्यायचं. बाळाच्या वेळेनुसारच आमची जीवनशैली तयार झाली होती. झोपेबाबत मी खूप लक्ष दिलं. वेळ मिळेल, तेव्हा मी माझी झोप पूर्ण केली. म्हणजे व्यवस्थित आराम घेणं, खूप गरजेचं होतं. आहाराबाबत काही नियम पाळले; पण गरजेचं आहे, ते सगळं खाल्लं.

आपल्या बाळासाठी काय गरजेचं आहे आणि स्वतःसाठी काय करायचं, हे मी नेहमी लक्षात ठेवलं. करिअरमध्ये पुन्हा जॉईन होताना घरच्यांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे कधी असं वाटलं नाही, की चित्रीकरणासाठी गेल्यावर घरी काय करायचं किंवा माझी मुलगी ओवी काय करत असेल? दोन-तीन वर्षांत एकाच दिनचर्येची सवय लागली होती.

त्यामुळे मी अशा गोष्टी किंवा प्रोजेक्ट्स घेतले नाहीत, ज्यामुळे मला खूप लांब जावं लागतं किंवा घरापासून खूप वेळ लांब राहावं लागतं. मी अशी कामं टाळली आणि लगेच होतील अशीच कामं स्वीकारली. कामं सुरू केली, तेव्हा शारीरिकदृष्ट्या मी तिथं असायचे; पण मानसिकदृष्ट्या घरी असायचे.

म्हणजे ओवी आता उठली असेल, ओवीची खायची वेळ झाली आहे, असं वाटायचं आणि मी कॉल करायची. घरच्यांना सांगायचं आणि त्यांचा प्रतिसाद असायचा की, ‘हो, आम्ही सगळं पाहतो.’ हळूहळू ते अंगवळणी पडलं; पण कुटुंबीयांमुळे काहीच समस्या आली नाही.

आई झाल्यानंतर कामाचा प्राधान्यक्रम बदलत गेला. कामाला सुरुवात केली, तेव्हा मुंबईच्या बाहेर काही सेटअप असतील आणि तिथे राहावं लागेल असं काम मिळालं तर मी ते नाकारलं. बाहेर सहा-सहा महिने राहण्यासारखे प्रोजेक्ट्स टाळले. माझं काम आणि माझा वेळ या दोन गोष्टींमध्ये समतोल राखण्याची काळजी घेतली.

आई झाल्यानंतर मला माझ्या मर्यादेनुसार निर्णय घ्यावे लागत होते. किती वेळ द्यायला पाहिजे, कामाचं स्वरूप काय आहे, मला कुठं जावं लागणार आणि कुठं प्रवास करायचा? हे सगळं विचारात घ्यावं लागत होतं. सध्या मी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘थोडं तुझं, थोडं माझं’ या मालिकेत आव्हानात्मक भूमिका साकारत असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, याची मला खात्री आहे.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

1) आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर करिअरमध्ये ब्रेक येईल का, याचा विचार आवश्यक नाही. काही गोष्टींना त्यांचा वेळ द्यायचाच असतो.

2) इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात आणि कोणत्याही पद्धतीने काम करता येतं. कामावर प्रेम असेल तर कोणतीच गोष्ट थांबवू शकत नाही.

3) प्रेग्नंसीमध्ये ब्रेक घ्यावा लागेल, असा विचार करू नका. इच्छाशक्ती असेल तर जबाबदारीसह काम करता येतं.

4) कामामुळे बाहेर जावं लागल्यास बाळाची जबाबदारी घरच्यांवर येते, हे ठीक आहे; पण अशा वेळी तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवणे गरजेचे असते. 

5) बाळाचा बाबा कामाला जाऊ शकतो, तर तुम्हीही जाऊ शकता. घरच्यांची साथ असल्यास काम आरामात करता येतं. पूर्वीच्या काळातील महिलांना फार सोयी-सुविधा नव्हत्या. पण आता आपलं कुटुंब सहकार्य करीत असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत नाही.

(शब्दांकन : आकांक्षा पाटील)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT