actress titiksha tawde sakal
लाइफस्टाइल

आनंद इतरांना ‘शूट’ करण्याचा!

मला बरेच छंद आहेत. चित्रकला, क्रिकेट, चित्रपट पाहणं असे अनेक छंद मला आहेत, हे माझ्या प्रेक्षकांनाही माहीत आहेत. मी एक नवी आवड काही वर्षांपासून जोपासत आहे, ती म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी.

सकाळ वृत्तसेवा

- तितिक्षा तावडे

मला बरेच छंद आहेत. चित्रकला, क्रिकेट, चित्रपट पाहणं असे अनेक छंद मला आहेत, हे माझ्या प्रेक्षकांनाही माहीत आहेत. मी एक नवी आवड काही वर्षांपासून जोपासत आहे, ती म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी.

अगदी लहान असताना आमच्या घरी रोलचा कॅमेरा होता. त्यामध्ये ३६ फोटो काढता यायचे. या मर्यादेमुळं मी तेव्हा काही फार ही आवड जोपासू शकले नाही.

पण काही वर्षांनी जेव्हा माझ्या हातात फोन आला, तेव्हा मात्र मी आवडीने फोटो काढायला लागले. यामध्ये काहीतरी करायचं आहे, असा उद्देश नव्हता. मात्र, एखादी साधी खोली पाहिली आणि त्यात प्रकाशाचा किरण आला, तरी मला फोटो काढायची इच्छा व्हायची. मला अँगल कळायचा आणि इथून फोटो काढल्यास चांगला येईल हे समजायचं. मी हळूहळू ते नियमितपणे करू लागले.

मित्र-मैत्रिणींचे फोटो काढू लागले. ‘आता तितिक्षा आहे, तर ती फोटो काढेल, व्हिडिओ काढेल,’ असं म्हणत ते निर्धास्त असायचे. व्हिडिओ काढण्याची आवड अगदी अलीकडची. आम्ही रील्स करू लागलो. मग मला कळायला लागलं की कोणता अँगल योग्य राहील, खाली बसून व्हिडिओ करायचा की उभा राहून यातले बारकावे लक्षात येऊ लागले. मला या गोष्टीचा कधीही कंटाळा येत नाही.

अगदी शूटिंग करताना दोन सीन्सच्या मध्ये मिळालेल्या वेळेत मी फोटो, व्हिडिओ काढते. मित्र-मैत्रिणींनी, सहकलाकारांनी मला या वेळात सांगितलं की, माझा फोटो, व्हिडिओ काढ गं! तर मी अगदी आनंदानं जाते. माझ्या मनासारखा व्हिडिओ शूट होत नाही, तोपर्यंत मी शांत बसत नाही. तो व्हिडिओ एडिट करून, त्याचा व्यवस्थित रील बनवून संबंधित व्यक्तीकडं सुपूर्द केल्याशिवाय मला चैन पडत नाही.

माझा नवरा सिद्धार्थ मला नेहमी सांगत असतो की, तू खूप छान व्हिडिओ करतेस, फोटो काढतेस. माझा छंद कळाल्यापासून त्याला माझ्यासाठी एक कॅमेरा घ्यायचा होता. मी म्हणायचे, ‘‘आता आयफोन हातात आहे, त्यामुळं त्याची गरज पडणार नाही.’’ मात्र, मी यू-ट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणं सुरू केल्यावर त्यानं मला एक सुंदर कॅमेरा घेऊन दिला आणि सांगितलं, ‘आता फोनवर काही करायचं नाही.

कॅमेऱ्यात शूट करायचं, जे काय असेल ते एकदम व्यवस्थित करायचं. तू जे खरंच छान करतेस, तर तुला चांगले रिसोर्सेसही मिळायला हवेत.’ त्यानं मला नेहमीच माझ्या छंदासाठी पाठिंबा दिला आहे. मला मदत करणं असेल किंवा लायटिंग, बॅकग्राउंड अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्याचा नेहमीच हातभार असतो.

मी फोटोग्राफीचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. मी प्रयोग करूनच शिकले. मी सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका करतेय. त्याच्या सेटवर दिवसभर असल्यानं मला काही गोष्टी कळू लागल्या आहेत. कॅमेऱ्याच्या काही गोष्टी किंवा शूट कसं करायचं, चेहरा कसा दिसायला हवा वगैरे अगदी प्राथमिक ज्ञान मला आलेलं आहे.

यू-ट्यूबसाठी कॅमेरा घेतला आहे, तोही मी अजून शिकत आहे, व्हिडिओ पाहूनच वापरायला शिकत आहे, पण या क्षेत्रात शिक्षण घ्यायला मला नक्कीच आवडेल. मी आता यू-ट्यूबवर जास्त लक्ष देत आहे. मला माझी टीम बनवायची आहे. त्यासाठी छोटे छोटे वर्कशॉप्स, कोर्सेस करायचे आहेत.

आपण नेहमी काहीतरी शिकत राहावं, असं म्हणतात. त्यामागं काय कारण आहे, हे मला कळू लागलं आहे. दररोज १५-१५ तास एकाच ठिकाणी काम करून आपल्या आयुष्यात फ्रीझ पॉइंट येतो, तिथं आपण अगदी कंफर्टेबल होतो आणि काहीतरी नवीन शिकण्याची ओढ कमी होते. मात्र या छंदानं मला काहीतरी नवीन शिकण्याची उमेद दिली.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणं आज काळाची गरज आहे. लोकांपर्यंत स्वतःला पोहोचवणं महत्त्वाचं आहे आणि याचा फायदा माझ्यासोबतच माझ्या जवळच्या व्यक्तींनाही निश्चितच होतो. या गोष्टीमुळं मला आत्मविश्वास मिळतो. आपण जे पोस्ट करतो, ते चांगल्या दर्जाचं असावं, असं मला सतत वाटत राहतं आणि त्यात माझ्या या छंदाचा मला खूप फायदा होतो...

(शब्दांकन ः वैष्णवी कारंजकर-इंगळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT