Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिना आला की, आपल्या सगळ्यांना ओढ लागते ती आषाढी एकादशीची. आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते.
आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ एकादशी आणि ‘महाएकादशी’ म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. वारकऱ्यांची पायी वारी आज अखेर पंढरपुरातील पांडुरंगाच्या चरणी लीन झाली.
आज चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठुनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने पंढरीची नगरी दुमदुमून गेली आहे. हा संपूर्ण उत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या पांडुरंगाला तुळशीचा हार वाहिला जातो. हा तुळशीचा हार विठ्ठलाला वाहण्याचे महत्व काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
तुळशीला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते. तुळशीचे महत्व जपण्यासाठी भारतीय महिला रोज सकाळी तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला विशेष महत्व आहे. लक्ष्मीसमान असलेली तुळस सूखदायक, कल्याणकारक आणि औषधी मानली जाते.
तुळशीच्या पानांमध्ये श्रीविष्णूंना आकर्षित करण्याची शक्ती असते, असे मानले जाते. पांडुरंग हे भगवान विष्णूंचे रूप आहे. त्यामुळे, विठ्ठलाच्या मुर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला मदत होते.
तुळशीला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते आणि लक्ष्मी ही श्री विष्णूंची अर्धांगिनी आहे. विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच रूप आहे. त्यामुळे, तुळस अर्थात लक्ष्मी त्यांच्यासोबत नेहमीच असते, अशी ही एक धारणा आहे. त्यामुळे, पांडुरंगाला तुळशीचा हार वाहिला जातो.
विठ्ठलाच्या छातीवर रूळणारा तुळशीच्या पानांचा-मंजिरींचा हार हा मूर्तीतील विष्णूरूपाच्या क्रियाशक्तीला चालणा देणारा असल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धारणा आहे. त्यामुळे, विठ्ठलाच्या मूर्तीला प्रेमाने तुळशीचा हार वाहिला जातो.
विशेष म्हणजे तुळशीच्या हारामुळे विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये शुद्धता आणि सकारात्मकता येते, असे मानले जाते. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळशीचा हार अर्पण करणे ही एक पारंपारिक प्रथा आहे, जी कित्येक पिढ्यांपासून चालत आली आहे. त्यामुळे, विठ्ठलाला तुळशीचा हार वाहण्याचे महत्व आणखी अधोरेखित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.