Dussehra 2024: भारत हा शक्ती व प्रकाशाची उपासना करणारा देश. ‘भा’ म्हणजे तेज व ‘रत’ म्हणजे रममाण होणारा. म्हणजे शक्तीच्या व तेजाच्या उपासनेत रममाण होणारे ते ‘भारतीय’!
शक्तीच्या रूपाने साक्षात परमेश्र्वरी देवी सर्व भूतमात्रांमध्ये स्थित असते असे आपली भारतीय संस्कृती सांगते. शक्ती सर्वांनाच पूजनीय असते. शक्तीची विविध रूपे असतात. जीवन जगण्यासाठी पदोपदी, प्रतिक्षणी आवश्यकता असणारी शक्ती, प्रत्येक देवतेच्या मागे असणारी ‘चिद्शक्ती’, मंत्रशक्तीच्या अगोदर असणारी ‘मातृकाशक्ती’, शंकर-महादेवांच्या पलीकडे असलेली ‘पराशक्ती’, सर्व मनुष्यमात्रांचे जीवन उजळून टाकणारी ‘कुंडलिनी शक्ती’, छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणारी ‘भवानी शक्ती’; असा हा सर्व शक्तीचा खेळ व पसारा आहे.
सहाजिकच वेगवेगळ्या मार्गांनी व वेगवेगळ्या वेळी या शक्तीची आठवण ठेवण्यासाठी शक्तिपूजनाचे अनेक सण असतात. त्यात सर्वांत महत्त्वाचा सण असतो ‘नवरात्र’! , भारतीय संस्कृतीने योजलेला नवरात्र उत्सव हा अंतर्बाह्य शुद्धी करणारा आणि शक्ती वाढविणारा उत्सव होय. नवरात्रीत नऊ रात्री शक्तिउपासना केल्यावर येतो तो विजयादशमी-दसरा-सीमोल्लंघनाचा दिवस. मनुष्य शरीर तसेच मन आरोग्यवान असेल तरच खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन होऊ शकते.
नवरात्राच्या नऊ दिवसात केलेल्या शक्तिउपासनेचे फळ, जगदंबा आदिशक्तीने दिलेली कृपा सर्वांना वाटायची तसेच ज्या गोष्टी त्रास देणाऱ्या व अकल्याणाच्या असतील त्यांना नष्ट करण्याचा मार्ग शोधून जुन्या शस्त्रांना परजून विघ्नांचा नाश करायचा असा हा विजयादशमीचा दिवस. दसऱ्याच्या दिवशी नवीन शिक्षणाची सुरुवात केली जाते. स्वतःच्या उपजीविकेच्या साधनांची, यंत्रांची पूजा केली जाते, जेणेकरून व्यवसाय हा देवत्वाशी जोडलेला आहे.
नैतिक अधिष्ठान ठेवून उपजीविकेसाठी काम केले व त्या पैशातून उदरनिर्वाह केला तरच अन्न अंगी लागते व जीवन समाधानी होते. तेव्हा श्रमप्रतिष्ठा म्हणून आपल्या कामाच्या ठिकाणी यंत्रसामुग्री, हत्यारे, अवजारे यांचे पूजन करून आपल्या कामाला देव समजून दशमीचा दिवस साजरा केला जातो.
विजयादशमीच्या मुहूर्तावर जर रोगावर वा अनारोग्यावर विजय मिळवायचा तर आत्तापर्यंतच्या आधुनिकतेच्या नावाखाली बांधलेल्या आजूबाजूच्या सीमा तोडून आपण पुन्हा भारतीय शास्त्र, भारतीय संस्कार व आयुर्वेदासारखा जीवनमंत्र स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी जीवनातील काही गोष्टींमध्ये केलेली तडजोड विसरून आपल्याला पुन्हा काही चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा लागेल.
काम (पित्त), क्रोध (पित्त-वात), लोभ (कफ), मोह (वात-कफ), मद (कफ-पित्त), मत्सर (वात), इच्छांमध्ये भरकटणारे मन, त्रिदोषज सन्निपातज अहंकार, चित्तातील संशय आणि चुकीचे निर्णय घेणारी बुद्धि-दुर्बुद्धी हे दहा शत्रू होत. या दहा शत्रूंना मारल्याशिवाय मनुष्य मुक्त होणार नाही व त्याला आत्मारामही भेटणार नाही.
दशानन रावणाला मारल्यानंतर सीतेला मुक्त केले, त्या रामविजयाचा जयजयकार करण्याचा उत्सव म्हणजे दसरा. मनुष्याला सीमेत बांधणाऱ्या किंवा मर्यादित करणाऱ्या दहा शत्रूंना जवळ करणारा तो दशानन. दहा शत्रू म्हणजे शंभर रोग आणि आरोग्य हे दहाही शत्रूंच्या बंधनाच्या सीमेपलीकडील अनुभव.
‘लवकर निजे लवकर उठे’ हा पूर्वीपासून सर्वांना माहीत असलेला अनुभवसिद्ध मंत्र. सकाळी लवकर उठल्याने अनेक फायदे होऊ शकतात. रोजच्या जीवनातील सर्व कामे मशिनद्वारे करून नंतर आरोग्यासाठी घरात वा जिममध्ये पुन्हा मशिनचीच मदत घेण्यापेक्षा काही कामे स्वतःची स्वतः केली तर त्यासाठी दिलेला वेळ जिममध्ये आरोग्यप्राप्तीसाठी दिलेल्या वेळापेक्षा कमीच असतो. सकाळी सकाळी शुद्ध व ताज्या हवेत फिरायला जाण्याची सवय ठेवल्यास येताना ताजे दूध आणणेही साध्य होऊ शकते.
सध्याच्या जीवनपद्धतीत हे सर्व अवघड व विचित्र वाटले तरी अशक्य नाही. हे सर्व आरोग्यासाठी व जीवनाचे ‘सोने लुटण्या’साठी आवश्यक आहे. आरोग्य टिकविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यात ताज्या दूध, लोणी व तूप यांचा वाटा फार मोठा म्हणजे जवळजवळ ५० टक्के इतका असतो असे म्हणायला हरकत नाही.
दूध-तुपाविषयी आज अनेक गैरसमज आढळतात. या गैरसमजांवर ज्ञानाच्या मदतीने मात केली तरच अनारोग्यावर मात होऊन सीमोल्लंघन होऊ व आरोग्य मिळू शकेल. रोग कसा येतो, कसा होतो याविषयीची माहिती व रोग नुसता आवरून न धरता तो मुळापासून दूर करण्यासाठी कशी योजना करता येईल याचे प्राथमिक ज्ञान सामान्यांना असणे आवश्यक आहे. गोळ्या घेऊन तात्पुरते रोगशमन करण्याची मानसिकता बदलावी लागेल. प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखून घेऊन आपला आहार-आचारविचार ठरवून घेतले तर आपल्याला विजय मिळून सीमोल्लंघनाचा खरा फायदा मिळू शकेल.
विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची व आपण वापरत असलेल्या अवजारांची पूजा करावी अशी पद्धत आहे. शेवटी ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञान कापता येते तसेच आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी काही वेळेला गोडीगुलाबीने पण ते शक्य नसल्यास कठोर शस्त्राने कापून काढाव्या लागतात. शस्त्र हे हिंसेसाठी नसावे हे खरे पण ते स्व-बचावासाठी नक्की असावे. आपल्या वाडवडिलोपार्जित संपत्तीवर, आपल्या संस्कारांवर, आपल्या परंपरेवर शत्रू चालून आला तर आपण कठोरपणे निर्णय घेऊन शत्रूचा नाश करावाच लागतो.
आरोग्य टिकविणे हे सर्वांत महत्त्वाचे. आरोग्य नसले तर सणही साजरा करता येत नाही आणि सणानिमित्ताने घरत केलेले गोड-धोड खाता येत नाही. गुडघे दुखत असले, शरीरात आमवात असला तर श्रीखंड कसे काय खाणार? तेव्हा आरोग्यासाठी असलेले अडथळे दूर करून आरोग्य मिळवावे व सण आनंदात साजरा करावा असा हा दिवस.विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, खरे पाहता हा सुवर्णमुहूर्ताचा दिवस.
सुवर्णाचे महत्त्व सर्व जगाला पटलेले आहे. सोन्याची खरेदी खूप प्रमाणात होत असावी कारण सोन्याचे भाव दिवसेंदिवस वर वर जात आहेत. सुवर्ण नेहमीच महाग होते, परंतु आता ते एवढे महाग झाले आहे की यापुढे सुवर्ण आहारात किती व कसे ठेवायचे असा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो.
परंतु शरीराची प्रतिकारशक्ती भरपूर असावी, कांती तेजःपुंज असावी, शरीर उत्तम असावे, हृदय-मेंदू यांनी उत्तम तऱ्हेने काम करावे असे ज्यांना वाटत असेल त्यांना काही प्रमाणात सुवर्ण आहारात ठेवावेच लागेल. सुवर्ण हा असा धातू आहे की जो कच्च्या स्वरूपात म्हणजे सुवर्ण वर्ख या स्वरूपात सेवन करता येतो. आयुष्यात सुवर्णकाल यावा असे वाटणाऱ्यांनी सुवर्णाच्या स्वरूपात निदान आपट्याची पाने, कांचनाराची पाने सुवर्ण म्हणून वाटावीत म्हणजे सुवर्णाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत निदान लक्षात तरी राहील.
विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, वाईट गोष्टी टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी मनःसामर्थ्य मिळो आणि मनापासून प्रेम करून अनेक मित्र मिळोत अशी इच्छा ठेवायला हरकत नाही. ज्याच्या मनात कुठलेही किल्मिष नाही, जो संकटे नुसतीच झाकून ठेवत नाही, तर नष्ट करतो, ज्याला अनेक मित्र आहेत, जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो, ज्याच्यावर लोक प्रेम करतात, जो शक्तीची उपासना करतो, त्याला आरोग्य मिळून त्याचे जीवन सुखासमाधानाचे नक्कीच होते.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.