World Mental Health Day | कोरोना काळात सर्वप्रथम शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यानंतर मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली. जवळपास दीड वर्ष ऑनलाईन शिकल्यानंतर आता काही प्रमाणात शाळा उघडण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यापासून राज्यभरात माध्यमिक शाळा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी प्राथमिक आणि पूर्वप्राथमिकचे वर्ग ऑनलाईन पद्धतीनेच भरत आहेत. दररोज पार पडणाऱ्या अभ्यासाच्या तासिका, शिकवणी, तसेच गृहपाठ करण्यासाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. आता पुन्हा सर्व गोष्टी नॉर्मलला येत असल्या, तरीही विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्याची सवय झाली आहे. यामुळे मुलांचा सर्वाधिक वेळ व्हर्च्युअल जगात व्यतीत होत आहे. या आभासी विश्वाशी मुलं लवकर जोडली गेल्याने त्याचा प्रभाव खोलवर जाणवतोय. अशा वेळी गोष्टी पूर्ववत होत असताना मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
थेट संवाद साधणे, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवणे, शिक्षकांसोबत शंकांचं निरसन करणे किंवा शाळेच्या मैदानात एकत्र खेळणे या सगळ्या कृत्यांचा सांधा ऑनलाईन शिक्षणाने निखळला. यातून नव्याने जन्माला येणाऱ्या ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या पिढीला दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि थेट संज्ञापन याचा अभावाचा सामना करावा लागतोय. दिवसभर घरात बसून कमी झालेलं एक्सपोजर आणि केवळ ऑनलाईन पद्धतीने संपर्कात राहण्याची कला या पिढीच्या मानसिक वर्तनावर प्रभाव पाडत आहे. आज जागतिक मानसिक दिनाच्या निमित्ताने कोरोना काळ आणि त्यानंतर 'अनलॉक' दरम्यान मुलांच्या मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांवर हा लेख प्रकाश टाकतो.
मुलं नैराश्याच्या गर्तेत!
पुढील शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा रद्द करणे आणि वर्ग सुरू होण्यापासून ते गुणांकनापर्यंत उद्धभवलेली अनिश्चितता विद्यार्थ्यांना नैराश्य आणि चिंताकडे ढकलत आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे मेहनत ओळखली जात नाही, असं विद्यार्थ्यांना वाटतंय. त्यामुळे अशा परिस्थितीशी मुलं सामना करू शकत नाहीत, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आधीच अंतर्गत मूल्यांकनांवर भर देत असल्याने, पुढच्या वर्षीही असेच चक्र दिसले तर विद्यार्थ्यांची चिंता वाढू शकते. मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गातील बहुतेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. तर त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्य दिवसभर त्यांच्या जवळपास आहेत. यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं, या मुलांना अवघड वाटतं. कारण पालकांचं कार्यालयीन काम, स्वयंपाकघर आणि घरची कामे एकाच वेळी सुरू आहेत. त्यामुळे छोट्याश्या जागेत एकाच वेळी घडणाऱ्या या प्रक्रियांना प्रतिसाद देणं मुलांना आव्हानात्मक वाटतंय. त्यामुळे चिंता वाढली आहे.
UNICEF च्या सर्वेक्षणात भारतातील मानसिक आरोग्याबद्दल अनास्था
कोरोना महामारी दरम्यान भारतातील मुलं आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यावर दुरागामी परिणाम होऊ शकतात, यासाठी युनिसेफने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात सूचना दिल्या होत्या. या अहवालानुसार, कोविड -19 महामारीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. साथीच्या आजाराने मुलांमधील संपूर्ण एका पिढीच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता निर्माण केली आहे. याबद्दल युनिसेफने 'द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2021' मध्ये काही महत्वाची निरीक्षणे मांडली आहेत.
युनिसेफ आणि गॅलपने 2021 च्या सुरुवातीला 21 देशांमधील 20,000 मुले आणि प्रौढांसह एक सर्वेक्षण केलं. यानुसार भारतातील मुले मानसिक तणावात आधार घेण्यास उदासीन असल्याचं स्पष्ट झालंय. भारतातील 15 ते 24 वर्षे वयोगटातील फक्त 41 टक्के तरुणांनी मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या किंवा यासंदर्भात ट्रिटमेंट घेण्यास समर्थन दर्शवले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारत हा या सर्वेक्षणातील 21 देशांपैकी एकमेव देश होता, जिथे खूप कमी तरुणांना मानसिक आरोग्याच्या समस्या असल्यास अन्य कोणाचा आधार घ्यावा, असं वाटत होतं. बाकीच्या प्रत्येक देशात बहुसंख्य तरुणांना (56 ते 95 टक्के पर्यंत) असे वाटले की मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणे आणि त्यावर उपचार घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आरोग्याबाबत उदासीनता आहे. भारतातील 15 ते 24 वर्षांच्या मुलांपैकी सुमारे 14 टक्के मुलं अनेकदा निराश झाल्याचे किंवा काही करण्यात स्वारस्य कमी असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण दर सात मुलांमागे एक, एवढं आहे.
कमी स्क्रिनटाईम हीच किल्ली'
ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर मुलांसोबत पालकांना त्या प्रक्रियेत सहभागी होणं गरजेचं झालं. आता या प्रक्रियेत पुढे गेल्यानंतर मुलांच्या सवयी मोडायच्या कशा, हे पालकांसमोरचं आव्हान ठरतंय. यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी स्क्रिनवर व्यतीत होणाऱ्या वेळेचा मुद्दा उपस्थित केलाय. मुलांचा स्क्रिनटाईन कमी करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा सर्वात जास्त वेळ स्क्रिनसमोर जातो. मात्र ऑफलाईन शाळा सुरू झाल्यास हा स्क्रिनटाईम आपसुकच कमी होईल, असे डॉ. देशपाडे यांनी सांगितले. त्यामुळे सोशल लर्निंगची गती वाढू शकते. ऑनलाईन शिक्षणामुळे अॅनिमेटेड लर्निंगची सवय लागली होती. ती हळूहळू कमी होऊन मुलं सामान्य परिस्थितीत वावरण्याची कला शिकतील, असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञ डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला. यामध्ये सोशल इंटेरॅक्शन (सामाजिक संवाद) हा महत्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
शाळा आणि घर वेगळं ठेवण्यात पालकांचं अपयश!
व्हर्च्युअल गोष्टींची सवय झाल्याने मेंदूला लाईव्ह घटनांशी सर्व गोष्टी पटापट जोडता येत नाहीत. संज्ञापनाची सवय आणि त्याची प्रक्रिया कळणं आवश्यक आहे. शाळा ही आयुष्यातील महत्वाच्या आणि मोठ्या प्रमाणात आठवणी देणारी संस्था आहे. मात्र, आता ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये हे कनेक्शन मिस झाल्याची खंत मानसोपचारतज्ज्ञ अनघा जठार यांनी व्यक्त केली. ऑनलाईन शिक्षणापासून ऑफलाईन प्रक्रियेत आल्यानंतर मुलांसमोरील आव्हानं पूर्णत: बदलणार आहेत, असे त्या म्हणाल्या.
सध्या शाळा आणि घर या संकल्पना एकत्र झाल्या आहेत. या दोन्हींमधील पडदा कायम ठेवण्यात पालकांना अपयश आलंय. ऑनलाईन शिक्षणात शाळा आणि घर या दोन्ही गोष्टी एकच असल्याने मुलांच्या वर्तणुकीत फरक पडला नाही. सध्या मुलं रात्रंदिवस मोबाईलचा वापर करत आहेत. या अतिरेकामुळे अनेक मुलांना कमी वयात चष्मा लागला. तर काहींना डोळ्याचे विकार संभावत असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ अनघा जठार यांनी दिली. सध्याची पिढी नव्या गोष्टी लवकर आत्मसात करत असली, तरीही मुलांच्या बदललेल्या रूटिनमुळे सर्वात आधी पालक प्रभावित होत असतात. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या पिढीला ऑफलाईन क्लासेससाठी तयार करणं, हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे.
'तो' शाळेतून घरी आल्यावर मोबाईल मागतो!
'सकाळ'ने काही पालकांशी संवाद साधला. मगील दोन वर्षांपासून मुलांना मोबाईल वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे आता दिवसभर शाळा करून घरी आल्यानंतरही मुलगा मोबाईल मागत असल्याचे एका पालकाने सांगितले. तर, दिवसभर ऑफलाईन शाळा झाल्यानंतर मुलं घरी येऊन एकमेकांशी कनेक्ट होऊन ऑनलाईन खेळ खेळत असल्याची माहिती एका ३७ वर्षांच्या महिलेने दिली. यालाच समांतर वागणूक एका इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची होती. मोबाईलची सवय झाल्याने हा विद्यार्थी शाळेतून घरी आल्यानंतर सोसायटीतील मैदानात खेळायला जाण्याऐवजी मोबाईलवर मित्रांसोबत कनेक्ट होण्यास प्राधान्य देत असल्याचं जाणवलं.
व्हर्च्युअल जग हेच विश्व!
प्राथमिक आणि पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यापासून मुलांचं लक्ष्य एकाग्र ठेवणं हे शिक्षक-पालकांसमोरचं आव्हान होतं. वृत्तीने चंचल असणाऱ्या या मुलांना ऑनलाईन क्लासेस दरम्यान गुंतवून ठेवण्यासाठी अॅनिमेटेड प्रेझेंटेशन्स देण्यात आले. गृहपाठासाठी सुद्धा कार्टून्स, अॅनिमेटेड काँटेटशी समांतर चालणारा आशय देण्यात आला. यामुळे मोबाईल, संगणक आणि टेलिव्हिजनवर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ जाऊ लागला. पण त्याचे काही साईडइफेक्ट्स होऊ शकतात.
कारण या आभासी जगात वावरणारी मुलं ज्यावेळी सत्यात घडणारे प्रसंग अनुभवतात, त्यावेळी त्याला प्रतिसाद कसा द्यावा, याचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. सभोवताली घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देताना मुलांच्या मनातील संभ्रमावस्था वाढलेली जाणवते. आभासी जग हेच विश्व आहे, अशा गैरसमजात या मुलांची वाढ होते. आणि दिवसरात्र त्याच कॅरेक्टरमध्ये अनेक लहान मुलं वावरताना दिसतात. दररोजच्या जगण्यात येणाऱ्या क्रिया, प्रतिक्रियांवर या आभासी जगातील पात्रांचा प्रभाव असू शकतो. त्यामुळे थेट संज्ञापनाची क्रिया मुलांना जड वाटू लागते.
समवयस्क मुलांशी मैत्री करणं, त्यांच्यासोबत खेळायला जाणं, एकमेकांशी स्वत:हून ओळख करून गप्पा मारणे या क्रिया सर्वजण डिजिटली जोडल्याने प्रभावित झाल्या. त्यामुळे प्रत्यक्ष जगात वावरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चेतना मुलांमध्ये कमी झाल्या आहेत. आभासी विश्वात घडणाऱ्या घटनांवर प्रत्यक्षात रिअॅक्ट होणं, त्याला अनुसरून दैनंदिन आयुष्य पार पाडणं आणि व्हर्च्युअल जगाशी समांतर विचार करत असताना सत्यात घडणाऱ्या घटना समजून घेणं, हे मुलांना त्रासदायक ठरू शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.