आजवर तुम्ही लाडूचे अनेक प्रकार ऐकले असतील. बुंदी, मोतीचूर, हलवा, बेसन, रवा, खवा, पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू असे अनेक प्रकार आहेत. लवकरच दिवाळीला सुरूवात होणार आहे. त्याआधी फराळ अन् त्याच्या रेसिपी पाहण्यात महिलावर्ग मग्न आहे.
तुम्हीही वेगळं काहीतरी रेसिपी शोधत असाल तर राघवदास लाडू बनवणे सोपे आहे. चवही वेगळी असल्याने केल्यावर लगेचच फस्त होतील असे हे लाडू आहेत. राघवदास लाडू कसे बनवायचे, त्याची रेसिपी कशी आहे ते पाहुयात.
२ वाट्या रवा, २ वाट्या डाळीचा रवा, २ वाट्या वनस्पती अथवा साजूक तूप, ५,६ वेलदोड्यांची पूड, बदामाचे काम, बेदाणे, ४ वाट्या साखर, पाव किलो (२५० ग्रॅम) खवा, अर्धी वाटी दूध, चिमूटभर केशरी रंग
जाड बुडाच्या पातेल्यात पाऊण वाटी तूप घालून मंद आचेवर रवा खमंग भाजावा. दुसऱ्या पातेल्यात उरलेले तूप घालून मंद आचेवर डाळीचा रवा खमंग भाजावा. भाजून झाल्यावर खाली उतरवून दूधाचा हबका मारून ढवळून, भाजून ठेवलेल्या रव्यात मिसळावा.
कढईमध्ये खवा हाताने मोकळा करून गुलाबी रंगावर भाजावा. ताटात काढून कोमट असताना हाताने मळून रवा व डाळीच्या भाजलेल्या रव्यात मिसळावा. त्यातच वेलदोडा पूड, बदाम काप व बेदाणे घालावेत.
४ वाट्या साखरेत दीड वाटी पाणी घालून एकतारी पाक करावा. थोडा केशरी रंग घालावा. गॅस बंद करून रवा खव्याचे मिश्रण घालून एकजीव होईपर्यंत ढवळावे.
मिश्रण घट्ट व्हायला वेळ लागतो. ६-७ तासांनी लाडू वळण्यायोग्य होतात. मध्य आकाराचे लाडू वळून वर बेदाणा व बदामाचा काप लावावा. मध्यम आकाराचे २५ लाडू होतात.
डाळ भरडी दळायला सांगावी व मैद्याच्या चाळणीने चाळून खालील पीठ बाजूला काढून वरचा रवा लाडवाला घ्यावा. फार जाड रवा काढून आणू नये.(Diwali Recipe 2023)
हे लाडू शक्यतो साजूक तुपात करावेत. खवा व साजूक तुपाने लाडूला छान चव येते. डाळीचा रवा भाजायला तूप जरा जास्तच लागते, नाहीतर डाळीचा रवा खमंग भाजला जात नाही.
तूप जास्त वाटले तर रवा पाकात घालून मिश्रण आळत आले की तूप वर येते. पातेले वाकडे करून तूप काढून घेता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.