कुर्ता असो, टॉप असो किंवा मग टी- शर्ट असो... सगळ्यांवर अगदी परफेक्ट मॅच होते ती आपली जीन्स. काळी, निळी किंवा ग्रे रंगाची एकच जीन्स असली तरी तिच्यावर वेगवेगळे ५ ते ६ टॉप अगदी सहज चालून जातात. म्हणूनच तर हल्ली तरुणाई अगदी सर्रासपणे जीन्स घालते.
तरुणाईच नाही तर आजकाल प्रौढ व्यक्ती किंवा अगदी वयस्कर मंडळीही आवडीने जीन्स घालताना दिसत आहेत. आपली आवडती जीन्स अधिक काळ टिकावी, चांगली फ्रेश दिसावी म्हणून ती धुताना मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे आणि काही चुका टाळल्या पाहिजेत.
जीन्स आपल्याला दिसायला एकदम दणकट दिसते. पण म्हणून ती धुतानाही तशीच जोरजोरात धुवावी असं मात्र मुळीच नाही. त्या उलट जीन्स अगदी हळूवारपणे धुतली पाहिजे. जीन्स दगडावर आपटू नये.
2. जीन्स धुताना ती नेहमी उलटी करावी. म्हणजेच जीन्सच्या आतली बाजू बाहेर काढावी आणि नंतरच जीन्स धुवावी. याचं कारण असं की जीन्स जर सरळ धुतली तर साबण, डिटर्जंट यामुळे ती भुरकट दिसू शकते.
एरवी आपण कपडे धुतले की ते पिळून त्याच्यातलं पाणी काढून घेतो. पण जीन्सच्या बाबतीत असं करू नये. जीन्स जोरजोरात पिळू नये. कारण तिच्यातला घट्टपणा निघून जातो आणि ती सैलसर होऊन जाते.
जीन्स धुण्यासाठी बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये उलटी करून जीन्स अर्धा तास भिजत ठेवा. मशिनमध्ये धुणार असाल तर नेहमी सॉफ्ट मोडवर ठेवा आणि ड्रायरमधून पिळू नका.