भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षाचा काळ लोटला असून, यावर्षी घरोघरी तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
- प्रा. डॉ. विजय चव्हाण
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षाचा काळ लोटला असून, यावर्षी घरोघरी तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ही बाब देशासाठी आणि देशवासीयांसाठी अभिमानाची असली तरी, समाजरुपी रंगमंचावर एक आदर्श माता, आदर्श बहिण, आदर्श पत्नी, आदर्श मुलगी, आदर्श सून आशा विविध भूमिका पार पाडणारी महिला आज सुरक्षित आहे का..? सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे का? या व यासारखे अनेक प्रश्न महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित होत असून त्यांची उत्तरे नाही असेच आहे.
भारतीय संस्कृतीत जिला अर्धांगिनी म्हटले गेले त्या महिलांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या अर्धी तरी आहे का..? याही प्रश्नाचे उत्तर निराशावादीच आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जी स्थिती आहे, त्यापेक्षाही भयावह स्थिती स्त्री साक्षरतेची आणि शिक्षणाची आहे. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी स्त्रिया हे प्रमाण तर नगण्यच आहे. जिला क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हटल्या गेले, त्या मातेलाच आज तिच्या अधिकारापासून वंचित ठेवल्या जात आहे. गर्भलिंग निदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा असला, तरी देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी स्त्री भ्रूणहत्येचे उद्योग सुरू झाले आहेत. या काळ्या कृत्यात गर्भलिंग निदान चाचणी करणारे डॉ. जेवढे जबाबदार आहेत तेवढेच मुलगी नको म्हणणारे आणि मुलांसाठी पेढे वाटणारे जबाबदार आहेत.स्त्री भ्रूणहत्येमुळे स्त्री-पुरुष प्रमाणात विषमता निर्माण झाल्याने दर हजारी स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे.
‘यत्र नार्यास्तू पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता’ महिलांना पूज्य मानून तिचा आदर करण्याची शिकवण देणाऱ्या भारतीय संस्कृतीचा आज आम्हाला विसर पडला आहे.त्यामुळे महिला अत्याचारांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.
हुंडाबळी,छेडछाड, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण, रस्त्याने जाता-येता होणारी अश्लील शेरेबाजी इत्यादी अपप्रवृत्तीमुळे स्त्री जीवन मरणप्राय झाले असून, ‘स्त्रियांचा जन्म नको श्रीहरी, रात अन् दिस पुरुषांची ताबेदारी’ असे म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीचे कडू घोट गिळण्याची वेळ आज महिलांवर आली आहे. ८ मार्च हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हा एक दिवस सन्मानाचा आणि उर्वरित ३६४ दिवस महिलांना पदोपदी अपमानाचे सहन करावे लागत असतील, तर हा दिवस का साजरा करावा..? असाही विचार मनात येतो.
‘तदेतद अर्धद्विदल भवती’ असे सांगून स्त्रियांना अर्धांगिनी मानणाऱ्या संस्कृतीचा जन्म भारतात झाला असला तरी, या सांस्कृतिक मूल्यांपासून भारतीय समाज दूर जात आहे. कारण आपण जर एखाद्या घराचा विचार केला,तर घरात नेहमी मुलांच्या तुलनेत मुलीला दुय्यम स्थान दिले जाते. मुलाला वंशाचा दिवा समजल्या जाते; पण, त्या घरातील व्यक्तींना हे माहीत नसते की, जर मुलगा हा वंशाचा दिवा असेल,तर त्या दिव्याची ज्योत ही मुलगी असते.आणि दोन्ही घरे प्रकाशमय करण्याची ताकद या स्त्री ज्योती मध्येच असते. आपल्या घरातील म्हातारी आजी लहान मुलीला नेहमी म्हणत असते की, तुझी मुलीची जात आहे, तू घराबाहेर पडू नकोस. एकप्रकारे ही आजी त्या मुलींच्या मुक्ततेला विषमतेचे नख लावून स्त्रीच स्त्रीचे अस्तित्व नष्ट करीत आहे.
वर्तमान परिस्थिती विचारात घेता पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीच्या उतरंडीत सर्वात खालचे स्थान स्त्रियांच्या वाट्याला आलेले आहे. उदाहरण द्यावयाचे झाले तर एखाद्या गावाची सरपंच महिला असते,पण गावचा कारभार हा तिचा पती पाहात असतो. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही स्त्रियांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवल्या जात असेल तर सहाजिकच मनात प्रश्न उद्भवतो की, भारतीय राज्यघटनेने महिलांना जे स्वातंत्र्य दिले ते कुठे गेले.....?
गांधीग्राम, अकोला मो. ९५४५२१७१४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.