- पृथा वीर
साडी महावस्त्र. पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक, साडी फक्त स्टाइल स्टेटमेंट नाही, तर साडीसोबत भावना जुळलेल्या असतात. पहिला सण, लग्न, पहिली संक्रांत, पहिली दिवाळी, पहिला पाडवा, लग्नाचा पहिला वाढदिवस ते कॉलेजचे गॅदरिंग. प्रत्येक साडीसोबत कितीतरी आठवणी असतात. हळूहळू नव्या साड्या येतात. मग त्या पहिल्या साड्या खाली खाली जातात.
एक दिवस पुन्हा त्या जुन्या साड्या नजरेस पडतात आणि पुन्हा त्या गोष्टी आठवतात. आज गुढीपाडवा. मराठी वर्षाचा पहिला दिवस. आजच्या दिवशी तर साडी आवश्यकच. त्याशिवाय पाडव्याचा आनंद द्विगुणित कसा होणार!
सणाला साडी पारंपरिक हवी. अर्थातच या साड्या व्हायब्रंट शेडसच्या, म्हणजे लाल, हिरवा, गर्द निळा, गुलाबी, केशरी या रंगाच्या हव्या. पारंपरिक साडीत सर्वाधिक लक्ष वेधते ती ‘नारायण पेठ’ साडी. ही साडी नेसायला सोपी आणि दिसायला छान. तिचा काठ महत्त्वाचा असतो. पाचवार, सहावार, नऊवार या प्रकारातील नारायण पेठ खूप उठून दिसते. ही साडी अंगावर व्यवस्थित बसते. दक्षिणेतील सर्वाधिक लोकप्रिय साडी म्हणजे ‘कांजीवरम’. शुद्ध सोने किंवा चांदी किंवा याच रंगांच्या धाग्यांपासून केलेले भरतकाम या साडीचे वैशिष्ट्य.
या साडीवर अंबाडा, गळ्यात मोजके अलंकार, केसात गजरा माळलेला खूप छान दिसतो. याशिवाय ‘काठापदराची’, ‘कोटा सिल्क’, ‘खणाची’ साडी हे पर्याय आहेतच. कोटा सिल्कमध्ये एव्हरग्रीन लाल रंग, ऑफ व्हाइट, गोल्डन कलर खूप सुंदर दिसतात. खणाची साडीसुद्धा खूप सुंदर दिसते. या साडीतील गर्द निळा, लाल, हिरवा, मोरपिशी, कॉफी, ग्रे कलर खूप उठून दिसतात. या साडीवर अंबाडा छान दिसतो. फिशटेल पोनीही छान दिसते. नथेशिवाय खणाची साडी अपूर्ण आहे.
खणाच्या साडीमध्ये फ्युजन लुक आणि अगदी मराठमोळा लुक करता येतो. ऑक्सिडाईज्ड दागिने या साडीवर अप्रतिम वाटतात.
सणाच्या धावपळीत ‘उपाडा सिल्क’ साडी पर्याय आहे. या साडीचे रंग व पोत अंगावर खुलतो. बारीक अंगकाठी असलेल्या मुलींपासून प्लस साइज अशा कुणासही उपाडा सिल्क साडी छान दिसते. मूळची ‘इल्केकल्लू’ नावाच्या विजापूरजवळच्या गावातील ‘इरकल’ साडी आता संपूर्णतः महाराष्ट्राची झाली आहे.
इरकल एकदम तलम आणि मुलायम असते. इरकल साडीवरील कशिदादेखील प्रसिद्ध आहे. गुढीपाडव्यासाठी ही साडी परफेक्ट. आज भलेही साडीचे प्रकार बदलले. साडी नेसण्याची पद्धत बदलली तरीही मॉर्डन काळातही साडीचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. याउलट साडीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढले आहे.
असे म्हणतात...
कपाळी चंद्रकोर,
नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर
अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव
जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते मराठी मुलगी खरी...
थोड्या वेगळ्या लुकसाठी ऑक्साडाइज्ड ज्वेलरीचा संपूर्ण साज अगदी बांगड्या, मंगळसूत्र, नथ, कानातले, अंगठी, पायातले, ऑक्सिडाइज्ड जोडवे घ्या.
साडीवर खूप डिझाइन, भरतकाम असल्यास साधे ब्लाऊज निवडा आणि साडी साधी वाटत असल्यास हेवी ब्लाऊज घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.